नागपूर येथे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत !

नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील प्रशासन !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर, ९ जुलै – शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व आणि उत्तर नागपूर येथील खोलगट भाग, हिवरीनगर, श्रीकृष्णनगर, नंदनवन, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्यामुळे घरांतील साहित्यांची हानी झाली आहे. पहिल्याच पावसात नागरिकांची दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर नागपूर येथील हुडको कॉलनी, बारा खोली, ‘एन्.आय.टी’ भागात जवळपास अडीच फूट पाणी साचलेले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवतांना कसरत करावी लागली. अनेक भागांत गटार वाहिनी नसल्याने प्रतिवर्षी समस्या उद्भवत आहेत, अशी माहिती नागरिकांनी दिली. याविषयी नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रतिवर्षी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने पावसाळ्यात या समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच हानी होऊनही काहीच हानीभरपाई मिळत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. (तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवणार्‍या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. पावसामुळे प्रतिवर्षी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)