रस्त्याची कडेची बाजू वाहून गेली. संरक्षक भिंतीही कोसळल्या.कुंभवडे ग्रामपंचायतीची निकृष्ट काम झाल्याची तक्रार |
जेव्हा कुंपणच शेत खाते तेव्हा…!
हे काम चालू असतांना प्रशासनातील संबंधित अधिकारी काय करत होते ? ठेकेदारासह या निकृष्ट कामाला बांधकाम विभागातील अधिकारीही तेवढेच उत्तरदायी आहेत ! |
सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील हेळेवाडी-गावठणवाडी रस्त्याचे काम भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांचे पती तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले ठेकेदार संदेश (गोट्या) सावंत यांनी हल्लीच पूर्ण केले होते; मात्र हा रस्ता पहिल्याच पावसात खचला आहे. या निकृष्ट कामाच्या विरोधात सामाजिक माध्यमांतून आवाज उठवल्याचा राग धरून संदेश सावंत यांनी भ्रमणभाषवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वैभववाडी येथील शिवसेनेचे विठोबा गुरव यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. (अशांवर शासन कोणती कारवाई करणार आहे ? – संपादक)
गुरव यांनी या रस्त्याविषयी सामाजिक माध्यमांतून दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे काम शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून संमत करण्यात आले. या वर्षीच्या पहिल्याच पावसात रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. संरक्षण भिंतीही खचल्या आहेत. पावसाच्या पाण्याने रस्त्याच्या बाजूची ‘साईड पट्टी’ (रस्त्याची कडेची बाजू) देखील वाहून गेली आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे. सावंत यांच्या भ्रष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. हे काम चालू असतांना निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे लक्षात येताच कुंभवडे ग्रामपंचायतीने तक्रार नोंद केली होती; मात्र तरीही हे काम पूर्ण केले गेले. याविषयी कुंभवडे ग्रामपंचायत सरपंचांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार नोंद केली आहे. (रस्त्याचे काम चालू असतांना प्रशासकीय यंत्रणा झोपली होती का ? निकृष्ट कामाविषयी तक्रार येऊनही संबंधित अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष का केले ? त्याच वेळी काम थांबवले असते, तर जनतेचे पैसे वाया गेले नसते ! – संपादक)
याआधीही संदेश सावंत यांनी जिल्हा परिषदेतील सत्तेचा वापर करून जिल्हा परिषदेच्या नाटळ मतदारसंघातील अनेक विकासकामांचा ठेका घेतला; मात्र ती कामे पूर्ण न करताच त्याची देयके देण्यात आली, असा आरोप गुरव यांनी केला आहे. या प्रकरणी गुरव यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंत यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.