ब्रह्मांडांमधील अन्य ग्रहांवरही जीव ! – नासाचे प्रमुख बिल नेल्सन

जीवसृष्टीतील लोकांशी भविष्यात नक्कीच संपर्क होण्याची व्यक्त केली आशा !

हिंदु धर्मशास्त्रानुसार अनंत कोटी ब्रह्मांड असून तेथे पृथ्वीसारखी जीवसृष्टी आहे. याची माहिती उच्चकोटीच्या संतांना आहे. ते अशा जीवसृष्टी असणार्‍या ग्रहांवर सूक्ष्मदेहाने जाऊनही येतात. याची विविध उदाहरणे धर्मग्रंथात उपलब्ध आहेत. विज्ञान अद्याप बाल्यावस्थेतच असल्याने त्याला अजून या जीवसृष्टीचा शोध लागलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – आपल्या ब्रह्मांडामध्ये आपण एकटेच मनुष्यप्राणी नाही, तर आपल्यापेक्षा अधिक बुद्धीमान जीव या ब्रह्मांडामध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांना आपण ‘इंटेलिजेंट लाइफ’ (मनुष्य किंवा प्राणी जो हुशार आहे, तसेच ज्याच्यात विचार करण्याची, समजून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता आहे.) असे म्हणतो, तर सामान्य भाषेमध्ये त्यांना ‘एलियन’ म्हटले जाते. पृथ्वीवरील मनुष्याला एक दिवस नक्कीच एलियन्स भेटतील, अशी आशा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनी म्हटले आहे. ते एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असणार्‍या पेंटगॉनने काही आठवड्यांपूर्वी एक अहवाल प्रसारित केला होता. या अहवालात म्हटले होते, ‘आम्ही एलियन असल्याच्या गोष्टीला दुजोरा देऊ शकत नाही.’ या पार्श्‍वभूमीवर बिल नेल्सन यांचे हे विधान केले आहे.

१. बिल नेल्सन पुढे म्हणाले की, ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी कोपर्‍यामध्ये दुसर्‍या जगाचे लोक आहेत. पृथ्वीच्या व्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीव रहात आहेत. नासा सातत्याने याकडे लक्ष ठेवून आहे. त्यांचे यान, अंतराळातील त्यांचे ‘सिग्नल’ आदी गोष्टींकडे नासाचे लक्ष आहे.

२. बिल नेल्सन म्हणाले की, ब्रह्मांड अब्जावधी वर्षे प्राचीन आहे. त्यामुळे अन्य ठिकाणीही सूर्य, दुसरी पृथ्वी आणि आपल्यासारखे वायूमंडळ असण्याची पूर्ण शक्यता आहे. आता आपल्याला त्यांचे सिग्नल सापडण्याचा अवकाश आहे. एक वेळ अशी येईल की, आपण अन्य ग्रहांवरील जिवांशी संपर्क करू.

३. न्यूयॉर्कस्थित कॉर्नेल युनिर्व्हसिटीच्या लिसा कालटेनेजर आणि ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या जॅकी फॅहर्टी यांनी सांगितले की, पृथ्वीच्या चारही दिशांना १ सहस्र ७१५ तारे आहेत. त्यावर एलियन्सचे अस्तित्व आहे. यांतील १ सहस्र ४०२ तारे अशा ठिकाणी आहेत जेथून ते थेट पृथ्वीवर लक्ष ठेवून आहेत. जेव्हा पृथ्वी या तार्‍यांच्या जवळून मार्गक्रमण करते, तेव्हा हे तारे पृथ्वीला पाहू शकतात. ३१३ तारे असे आहेत जे पृथ्वीपासून थोडे दूर आहेत; मात्र पृथ्वीवरून पाठवण्यात येणार्‍या रेडिओ लहरी ते रोखतात किंवा पकडतात.