मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार्या राज्यातील विविध विभागांतील १५ सहस्र ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाने संमती दिली आहे. यात वर्ष २०१८ पासूनची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यांत ‘अ’ गटातील ४ सहस्र ४१७, ‘ब’ गटातील ८ सहस्र ३१ आणि ‘क’ गटातील ३ सहस्र ६३ पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. २ वर्षांपूूर्वी लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊनही आतापर्यंत मुलाखतीसाठी न बोलावलेल्या स्वप्नील लोणकर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागांच्या भरतीविषयी सरकार नेमके काय करत आहे ?’ असा प्रश्न विरोधकांनी विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले.
न्यायालयाचे नाव पुढे करून सरकार दिशाभूल करत आहे ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
सर्वोच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचे कारण पुढे करून सरकार ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरता आल्या नाहीत’, असे जे कारण देत आहे, ते चुकीचे आहे. सरकार दिशाभूल करत आहे, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘पुढील काळातही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा घेण्यात येतील, त्या परीक्षा, मुलाखत आणि नियुक्ती यांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात यावा. असे केल्यास परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.’’