दीर्घकाळ काम करणार्‍यांना हृदयविकार आणि स्ट्रोक यांचा अधिक धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

नवी देहली – दीर्घकाळ काम करणार्‍या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’ यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या अहवालात म्हटले आहे. ‘एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल’ नियतकालिकामध्ये छापण्यात आलेला जागतिक आरोग्य संघटना आणि ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन’ यांच्या अभ्यासानुसार वर्ष २०१६ मध्ये दीर्घकाळ काम केल्याने स्ट्रोक आणि हृदयाचे आजार यांमुळे ७ लाख ४५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला.

१. या अभ्यासानुसार वर्ष २०१६ मध्ये आठवड्याला न्यूनतम ५५ घंटे काम केल्याने ३ लाख ९८ सहस्र लोकांचा स्ट्रोकमुळे आणि ३ लाख ४७ सहस्र लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

२. या अहवालानुसार दीर्घकाळ काम केल्याचा सर्वाधिक परिणाम पुरुषांवर होत आहे. त्याचप्रमाणे ४५ ते ७४ वयोगटातील जे पुरुष प्रत्येक आठवड्याला ५५ घंट्यांपेक्षा अधिक काम करत होते, त्यांच्या मृत्यूचा दर आकडा ७२ टक्के नोंदवण्यात आला.