चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचा प्रयत्न

अमेरिकेने सैन्य माघारी बोलावल्यामुळे चीनचे अफगाणिस्तानवर लक्ष !

या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग

काबूल – अफगाणिस्तामध्ये २० वर्षे युद्ध केल्यानंतर आता अमेरिकेचे सैन्य तेथून माघारी जात आहे. याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. चीन अफगाणिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या (‘सीपीईसी’च्या) माध्यमातून अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याच्या सिद्धतेत असल्याची चर्चा आहे.

१. अफगाणिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीवर चीनचा डोळा आहे. त्यामुळेच चीन सीपीईसीचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्याच्या प्रयत्नात आहे. अफगाणिस्तान सरकारचे अधिकारी या प्रकल्पाविषयी विचार करत आहेत. चीन या प्रकल्पाच्या माध्यमातून जगातील इतर देशांना जोडण्याच्या प्रयत्नात आहे.

२. पाकिस्तानमधील पेशावर शहरापासून ते अफगाणिस्तानची राजधानी काबूलपर्यंत महामार्ग बांधण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. हा महामार्ग बांधला गेला, तर तो चीनच्या सीपीईसी या प्रकल्पाचा भाग होईल. चीन त्याचा प्रकल्प काबूलपर्यंत वाढवण्यासाठी मागील ५ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तान सरकारवर अमेरिकेचा दबाव असल्याने चीनचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. आता अफगाणिस्तानमधून अमेरिका माघार घेत असल्याने अफगाण सरकार चीनचे स्वागत करण्याची शक्यता आहे.

३. अमेरिका माघार घेत असल्याने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अफगाण सरकारला एका खंबीर मित्रदेशाची आवश्यकता आहे. या मित्र देशाकडून अफगाण सैन्याला मोठ्या प्रमाणावर साहाय्य व्हावे, अशी अफगाण सरकारची इच्छा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.