अफगाणिस्तानमधील तखार प्रांतात पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे !

पुरुष-महिलांसाठी कठोर नियम लागू !

उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !

काबूल – अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्याने माघार घेण्यास आरंभ केल्यापासून तेथे पुन्हा एकदा तालिबानने हातपाय पसरणे चालू केले आहे. अफगाणिस्तानमधील ८० टक्के जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या तखार प्रांतात स्वतःचे कायदे लागू केले आहेत. यामध्ये पुरुषांना दाढी ठेवणे अनिवार्य करण्यात आले असून महिलांना एकटे घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तालिबानने तरुणींना हुंडा देण्याविषयीही नवे नियम बनवले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द न्यूज’ने मानवाधिकार कार्यकर्त्यांचा संदर्भ देत ही माहिती दिली.

तखार प्रांतीय परिषदेने सांगितले की, ज्या भागांवर तालिबानने नियंत्रण मिळवले आहे, तेथील खाद्यपदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा भागांतील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेथे दैनंदिन नागरी सेवा देण्यासाठी कुणीही जात नाही. रुग्णालये आणि शाळाही बंद पडल्या आहेत. तखार प्रांताचे राज्यपाल अब्दुल्ला कारलुक यांनी सांगितले की, तालिबानने सरकारी इमारती नष्ट केल्या आहेत. त्यांनी सर्व काही लुटले असून आता तिथे काहीही शिल्लक राहिलेले नाही.