भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘ओबीसी’ आरक्षणासाठी ‘चक्काजाम’ आंदोलन

‘ओबीसीं’ना न्याय न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

‘ओबीसी’ आरक्षणासाठी सांगली येथे करण्यात आलेले ‘चक्काजाम’ आंदोलन

सांगली, २७ जून (वार्ता.) – ओबीसींचे राजकीय आरक्षण, तसेच मराठा समाजाचे पदोन्नती मधील आरक्षण रहित करून सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे. ‘ओबीसीं’ना न्याय न मिळाल्यास महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडू, अशी चेतावणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. भाजपच्या वतीने २६ जून या दिवशी कर्मवीर भाऊराव चौकात ‘ओबीसी’ आरक्षणासाठी ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ही चेतावणी त्यांनी दिली.

या आंदोलनात पोतराज, वासुदेव, वाघ्या मुरळी आणि बारा बलुतेदार यांसह भाजप आमदार सुधीर गाडगीळ, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ. नीता केळकर, संघटन सरचिटणीस दीपक माने, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती शिंदे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, प्रियानंद कांबळे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

‘ओबीसी’ आरक्षणासाठी कोल्हापूर येथे करण्यात आलेले ‘चक्काजाम’ आंदोलन

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी या वेळी संदीप कुंभार, हंबीरराव पाटील, महेश मोरे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षा विद्या बनछोडे, वर्षा कुंभार यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.