(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही !’ – अभिनेत्री सायली संजीव

वटपौर्णिमेनिमित्त व्रतवैकल्ये आणि अध्यात्म यांविषयी अभ्यास नसलेल्या अभिनेत्रीचे व्याख्यान ठेवून अंनिसचा हिंदूंना संभ्रमित करण्याचा प्रयत्न !

अभिनेत्री सायली संजीव

मुंबई, २६ जून (वार्ता.) – प्रत्येक व्रतामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला कोणतेही वैज्ञानिक कारण नाही, असे अकलेचे तारे मराठी चित्रपट अभिनेत्री सायली संजीव यांनी तोडले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्त ‘चला व्रतवैकल्याकडे नव्या दृष्टीने पाहूया’, या विषयावर अभिनेत्री सायली संजीव यांचे ‘ऑनलाईन’ जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी मांडलेला विषय पहाता त्यांचा अध्यात्म आणि व्रतवैकल्ये यांविषयी काडीमात्र अभ्यास नसल्याचे दिसून आले. (अशा विषयावर बोलण्यासाठी जाणकारांना बोलवायला हवे, इतका तरी ‘विवेक’ अंनिसकडून अपेक्षित होता. चित्रपटसृष्टीत अभिनय करता आला, म्हणजे अध्यात्मशास्त्र समजते का ? स्वत:च्या विचारांना लोक भीक घालत नसल्यामुळे कलाकारांना बोलावून लोकांना आकर्षित करण्याचाच हा अंनिसचा प्रकार म्हणावा लागेल. हिंदु धर्मशास्त्राशी संबंधित विषयावर बोलण्यासाठी कुणालाही बोलावणारी अंनिस अन्य धर्मियांच्या संदर्भात असे करण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? – संपादक)

अभिनेत्री सायली संजीव यांनी तोडलेले अकलेचे तारे 

१. मासिक पाळीच्या वेळी महिला मंदिरात जात नाहीत, तसेच लोणच्याच्या बरणीला हात लावत नाहीत. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अशा अनेक गोष्टी महिलांवर लादल्या जातात. याची कारणे विचारली पाहिजेत.(मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अधिक सात्त्विकता असते. एखादे देवस्थान जागृत असल्यास त्या ठिकाणी त्या देवतेची शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असते. या उलट मासिक धर्माच्या काळात महिलांमधील रजोगुण वाढलेला असल्यामुळे त्यांना मंदिरात गेल्यावर त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मासिक धर्माच्या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, हे हिंदु धर्मात सांगितले आहे. याविषयी सायली संजीव यांनी अभ्यास करावा ! – संपादक)

२. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मला पटले, तर मी करीन. सद्यःस्थितीत ७ मासांतही घटस्फोट होतात आणि येथे ७ जन्मांसाठी व्रत केले जाते. (आजकाल ज्या  व्यक्तीस्वातंत्र्याच्या संकल्पना मांडल्या जातात, त्या दुसरे तिसरे काहीही नसून केवळ स्वैराचार आहे आणि स्वैराचाराने वागल्यामुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. याउलट सहस्रो वर्षांपासून करण्यात येणार्‍या व्रतवैकल्यांना धर्मशास्त्रीय आधार असून समाज एकसंध रहातो आणि पर्यायाने अखिल मानवजातीला त्याचा लाभच होतो ! – संपादक) तेच स्त्रियांना खांद्याला खांदा लावून उभे रहायला, तर दुसरीकडे घरात बसून व्रत करायला सांगतात. स्त्री-पुरुषांमधील हा भेदभाव काढून समानता आणा.

३. या वेळी सायली संजीव यांनी त्यांच्या घरात होत असलेल्या व्रतवैकल्यांना विरोध केल्याचेही सांगितले. (अंनिसच्या ‘विचारपिठा’वर जाण्याचा हाच तर महत्त्वाचा निकष असतो ! – संपादक)

हिंदु धर्मातील विधींना अंधश्रद्धा ठरवण्याचा खटाटोप करणार्‍या अंनिसचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून पसरवल्या जाणार्‍या अंधश्रद्धेविषयी मात्र मौन !

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने ‘अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या धर्मांतराविषयी अंनिस आवाज उठवणार आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला. तेव्हा आयोजकांनी हिंदु धर्मात जातीय व्यवस्था असल्यामुळे धर्मांतर होत असल्याचे सांगून प्रश्‍नाला बगल दिली. (अन्य धर्मातील अंधश्रद्धेविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढायचा नाही; मात्र उठसूठ हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधीला अंधश्रद्धा ठरवण्याचा प्रयत्न करायचा, यातून अंनिसचा हिंदुद्वेष दिसून येतो. अन्य धर्मांतील अंधश्रद्धांविषयी मौन बाळगणारी अंनिस हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठीच कार्यरत आहे, हेच यातून उघड होत नाही का ? – संपादक)

क्षणचित्रे

१. अभिनेत्री सायली संजीव यांचे भाषण झाल्यानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रश्‍न विचारण्याची संधी न देता आयोजकांनी त्यांना हवे असलेले प्रश्‍न विचारले.

२. कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही महिला विषयाच्या अनुषंगाने प्रश्‍न विचारण्याऐवजी सायली संजीव यांना त्यांचा नवीन चित्रपट कोणत्या ‘यू ट्यूब चॅनेल’वर पहायला मिळेल, यांसारखे प्रश्‍न विचारत होत्या. त्यातून व्याख्यानाऐवजी त्यांचे स्वारस्य चित्रपटात असल्याचे दिसून आले.

३. कार्यक्रमाच्या प्रारंभी वटपौर्णिमेचे व्रत म्हणजे अंधश्रद्धा असल्याचे सांगणारे अंनिसचे गीत सादर करण्यात आले. यातून वटपौर्णिमा व्रताला अंधश्रद्धा ठरवण्यासाठीच अंनिसने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्ट झाले.