कोरोनाविरुद्धच्या लढाईत योग हाच आशेचा किरण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१९० देशांत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताचे भारतियांना मार्गदर्शन करतांना

नवी देहली – आज संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या लढाईत योग हा आशेचा किरण म्हणून समोर आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून या दिवशी ७ व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताचे भारतियांना मार्गदर्शन करतांना केले. यावर्षीचा योगविचार ‘योगा फॉर वेलनेस’ (निरोगी आरोग्यसाठी योग) असा ठेवण्यात आला आहे. जगातील १९० देशांत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.

मोदी म्हणाले की, गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे जगात कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत; मात्र तरीही योगदिनी लोकांचा उत्साह न्यून झालेला नाही. यावर्षीचा योग विचार ‘योगा फॉर वेलनेस’ असून यामुळे लोकांमध्ये आकर्षण वाढवले आहे. मी आशा करतो की, प्रत्येक देश, समाज आणि व्यक्ती निरोगी रहावी. कोरोनाच्या या कठीण काळात योगविषयी लोकांमध्ये आवड निर्माण झाली आहे. योगमुळे लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा आत्मविश्‍वास वाढला आहे. योगविषयी जगभरात संशोधन केले जात आहे. प्रतिकारशक्तीवर योगाचा किती सकारात्मक परिणाम पडतो, याचेही संशोधन केले जात आहे.

‘एम-योग’ अ‍ॅपचा प्रारंभ होणार !

भारत आता जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ‘एम्-योग’ अ‍ॅप चालू करणार आहे. या अ‍ॅपमध्ये वेगवेगळे आसन आणि इतर माहिती उपलब्ध असणार आहे. ही माहिती वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल.