प्रस्थानाच्या दिवसापर्यंत राज्य सरकारकडून पायी वारीच्या अनुमतीची आशा ! – भाऊसाहेब गोसावी, अध्यक्ष, माऊली पालखी सोहळा संघटना

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याविषयी वारकरी आग्रही असून आम्हाला सरकारकडून पायी वारीसाठी अनुमती मिळेल, अशी अजूनही आशा आहे; मात्र सरकारने अनुमती न दिल्यास सरकारी नियमानुसार पालखी सोहळा करणार, अशी माहिती संत ज्ञानेश्‍वर पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी यांनी दिली.

२० जून या दिवशी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील नोंदणी असलेले ४३० दिंडी प्रतिनिधी, पालखी सोहळा विश्‍वस्त आणि आळंदी देवस्थान विश्‍वस्त यांची येथील ज्ञानेश्‍वर मंदिरात बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

१. वाखरी ते पंढरपूर पायी येतांना विसाव्याजवळ होणारे माऊली पालखी सोहळ्यातील अखेरचे उभे रिंगण येथे करता येणार असून याला सरकारनेही अनुमती दिली आहे; मात्र यात अश्‍वाला अनुमती नसल्याने आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माऊलीसोबत अश्‍व देण्याची मागणी करणार आहे, असे पालखी सोहळा प्रमुख अधिवक्ता विकास ढगे यांनी या वेळी सांगितले.

२. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना अध्यक्ष गोसावी म्हणाले की, पायी वारीविषयी वारकर्‍यांची आग्रही भूमिका असून पालखी विश्‍वस्त सरकारशी चर्चा करत आहेत. आम्हाला राज्य सरकारकडून प्रस्थानाच्या दिवसापर्यंत पायी वारीच्या अनुमतीची आशा आहे; मात्र माऊली पालखी सोहळा सरकारचे नियम मोडणार नाही.