पुणे, २० जून – येथील प्रसिद्ध चितळे बंधूंना खंडणी मागितल्याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका प्रतिष्ठित शाळेतील पूनम परदेशी या शिक्षिकाही सहभागी आहेत. (असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिक्षक कधीतरी आदर्श विद्यार्थी घडवू शकतील का ? – संपादक) गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई केली असून आरोपींच्या एका सहकार्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांपैकी सुनील परदेशी, करण परदेशी आणि अक्षय यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. (गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्यानेच ते वारंवार गुन्हे करण्यास धजावतात, असे म्हटल्यास चूक ते काय ! – संपादक)
अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेने चितळे बंधूंना ई-मेल तसेच दूरभाष करून दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडला असल्याची तक्रार करत ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या वेळी त्यांनी अपकीर्ती करण्याची, तसेच पैसे दिले नाहीत, तर दुकान बंद करायला लावू, अशी धमकीही दिली होती. त्यांनी प्रारंभी केलेली ५ लाख रुपयांची मागणी नंतर २० लाख रुपयांपर्यंत पोचली होती. चितळेंनी तक्रार केल्यानंतर आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली.