तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी २१ जूनपासून नियंत्रित पद्धतीने ‘पुच्छ’ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
२१ जून २०२१ या दिवशी पुच्छ कालव्याद्वारे धरणातील पाणी तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे, तसेच सद्य:स्थितीत धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरण क्षेत्राच्या बाहेरील पाणलोट क्षेत्रातील आणि खरारी नाल्यातील पाणी नदीपात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, तसेच नदीच्या पात्रात उतरू नये. रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीच्या पात्रातून ये-जा करू नये. नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी जाणार्या महिला, पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याविषयी आवश्यक ती सतर्कता बाळगावी. नदीकाठच्या आणि इतर सर्व ग्रामस्थांना सतर्कतेची चेतावणी ग्रामस्तरावर दवंडी पिटवून देण्यात यावी आणि जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कोनाळकट्टा येथील तिलारी प्रकल्पाच्या साहाय्यक अभियंत्यांनी केले आहे.