कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत १७ फुटांनी वाढ झाली आहे. नदीची पाणीपातळी सध्या ३० फूट झाली आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून चंद्र फाटा-शेळेवाडी याला असलेला पर्यायी रस्ता पाण्याने वाहून गेला आहे. यामुळे गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
कागल तालुक्यातील बाचणी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा-बाचणी परिसरातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, शेडशाळ, कवठेगुलंद भागातील शेतांत पाणी साचले आहे. यामुळे भाजीपाला, ऊस, तसेच नवीन पेरणी केलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस : नागठाणे बंधारा रस्ता वाहतुकीसाठी बंद
सांगली – जिल्ह्यात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून ग्रामीण भागातील अनेक ओढे, नाले येथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
निपाणी (जिल्हा बेळगाव) – गेल्या २ दिवसांपासून चालू असलेल्या पावसाने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर वहात असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. १७ जून या दिवशी दूधगंगेवरील ४ आणि वेदगंगेवरील ३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अथणी, कागवाड, रायबाग, हुक्केरी तालुक्यातही २ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.