भर पावसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे ‘मूक आंदोलन’ !

मूक आंदोलन

कोल्हापूर, १६ जून (वार्ता.) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी सकाळी १० वाजता भर पावसात ‘मूक आंदोलन’ करण्यात आले. काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते, समन्वयक सहभागी झाले होते.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. छत्रपती शाहू महाराज : मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन देहलीपर्यंत पाठपुरावा करायला हवा. केंद्र सरकारने हा विषय मनावर घेतला, तरच तो सुटू शकतो. दोन तृतीयांश खासदारांनी पाठिंबा देऊन नवीन कायदा आणला पाहिजे. गेल्या ७० वर्षांत घटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या, तर मराठा आरक्षण कायद्यासाठी दुरुस्ती का केली जात नाही ? हा विषय पंतप्रधानांपर्यंत गेला पाहिजे. मराठा आरक्षणाविषयी पंतप्रधानांचे काय विचार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

२. सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याविषयी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी मुंबईला यावे. मी संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देतो. चर्चेने आपण प्रश्‍न सोडवू.

३. धैर्यशील माने, खासदार, शिवसेना : या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे टाकले आहे. आरक्षण कुणामुळे थांबले ? आरक्षणाला कुणाचाच विरोध नसतांना हा पेच का सुटत नाही ? हा समाजाला पडलेला प्रश्‍न आहे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवीन, तसेच पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनाही भेटीन.

४. चंद्रकांत बराले, हिंदू एकता आंदोलन : कुणी मराठ्यांची परीक्षा घेऊ नये, हे राज्यकर्ते आणि न्यायालय यांनी समजून घ्यायला हवे अन्यथा झालेला उद्रेक थांबवणे अवघड होईल.

अन्य घडामोडी

१. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे सलाईन लावून आंदोलनस्थळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

२. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनास येणार्‍या प्रत्येक समन्वयकाची नोंद पोलीस ठेवत होते. १३५ अधिकारी, १ सहस्र २०० पोलीस, ३०० गृहरक्षक दलाचे सैनिक शहरातील प्रमुख चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर कार्यरत होते. जिल्ह्यात ३५, तर शहरात १२ ठिकाणी नाकाबंदी केंद्र करण्यात आले होते.

३. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन संभाजीराजे यांना पाठिंब्याचे निवेदन दिले.