अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येविषयी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सत्य लपवून का ठेवले आहे ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत

मुंबई – अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने) हातात घेऊन ३१० दिवस उलटले आहेत. सुशांतसिंह यांची हत्या झाली कि नाही ? याविषयीचे सूत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या समितीने निकाली काढून २५० दिवस झाले. असे असतांना सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय अंतिम निष्कर्ष केव्हा सांगणार ? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे ? असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटेलिया’ बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांविषयी सचिन सावंत पुढे म्हणाले की,

१. या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ला (मुख्य सूत्रधाराला) राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) का पकडू शकत नाही ? काही गुप्त करार झाला आहे का ? या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ‘एन्.आय.ए.’ने अधिक वेळ मागितला आहे; मात्र अद्याप काहीच का केले नाही ?

२. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण का होत नाही ? जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना अधिक महत्त्व दिले जात आहे.

३. केंद्रातील मोदी सरकार महाविकास आघाडी सरकारची अपकीर्ती करण्यासाठी एन्.आय.ए., अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय यांचा ‘राजकीय शस्त्र’ म्हणून वापर करत आहे; परंतु अखेर विजय सत्याचा होतो, हे लक्षात ठेवा.