बिहारमध्ये चिराग पासवान यांच्याविरुद्ध लोकजनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांचे बंड !

भारतीय राजकारणातील तत्त्वहीनता ! पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे लोकप्रतिनिधी कधी जनतेशी एकनिष्ठ रहातील का ?

खासदार जदयु पक्षाच्या वाटेवर !

डावीकडून पशुपती कुमार पारस आणि चिराग पासवान

पाटलीपुत्र (पटना) – बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष फुटीच्या उबंरठ्यावर उभा असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या पाचही खासदारांनी रामविलास पासवान यांचे पुत्र तथा त्यांचे राजकीय वारसदार चिराग पासवान यांच्याविरुद्ध बंड पुकारला आहे. पशुपती कुमार पारस (चिराग पासवान यांचे काका), प्रिन्स राज (चिराग पासवान यांचे चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली केशर अशी या खासदारांची नावे आहेत.

हे सर्व जण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) अर्थात् जदयू पक्षात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि या पाचही खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ‘आम्हाला स्वंतत्र गट म्हणून मान्यता द्यावी’, अशी मागणी केली आहे. बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजप यांच्यासमवेत न लढवता स्वतंत्रपणे लढवण्याचा चिराग पासवान यांचा निर्णय या पाचही खासदारांना अमान्य होता. तेव्हापासून या फुटीची शक्यता वर्तवली जात होती. यावर चिराग पासवान यांनी ‘मी माझ्या वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलो आहे, याही धक्क्यातून सावरीन’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.