सांगली, ११ जून (वार्ता.) – १ जूनपासून महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अल्प झाली आहे; परंतु अजूनही उद्योग धंदे आणि व्यापार चालू झाला नाही. दळणवळण बंदीमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल आणि आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापार अन् उद्योग व्यवसाय पूर्ववत् चालू करावेत, या मागणीचे निवेदन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना ११ जून या दिवशी दिले.
डॉ. अभिजित चौधरी यांनी २ दिवसांत पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. या वेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, डॉ. भालचंद्र साठये, रघुनाथ सरगर, अविनाश मोहिते, गणपति साळुंखे, अमित गडदे, अजयकुमार वाले उपस्थित होते.