नागपूर – अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी एक याचिका अमरावती येथील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट केली आहे. सध्या ही याचिका न्यायप्रविष्ट आहे; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा कौर यांचे जातवैधता प्रमाणपत्र नुकतेच रहित केले आहे. याविषयी आनंदराव अडसूळ यांचे अधिवक्ता राघव कवीमंडन म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा कौर यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने त्यांच्याविरुद्ध नागपूर खंडपिठात न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकेला बळकटी मिळाली आहे. आता त्यांची खासदारकी रहित करण्याची मागणी न्यायालयात करणार आहे.’’