|
कोल्हापूर, ९ जून (वार्ता.) – विशाळगडावरील झालेल्या अतिक्रमणांच्या संदर्भात पुणे येथील पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी विशाळगडाची पहाणी केली. गडावर अतिक्रमणे करणार्या १२ जणांना त्यांची अतिक्रमणे काढून घेण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढून न घेतल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या संदर्भात २६ जून या दिवशी विलास वहाणे हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेणार आहेत, असे वृत्त काही प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.
१. विशाळगडाच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे १४ मार्च २०२१ या दिवशी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. १६ मार्च या दिवशी कृती समितीने पहिल्यांदा कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली. यानंतर कृती समितीने कोल्हापूर येथे घंटानाद आंदोलन केले, राज्यभर ‘ऑनलाईन’ आंदोलन केले, तसेच कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांत निवेदने दिली. यासह कोल्हापूर येथे विविध लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना याविषयी अवगत केले.
२. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी शिष्टमंडळासह पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांची पुणे येथे २३ मार्च या दिवशी भेट घेतली होती. या वेळी श्री. घनवट यांनी पुराव्यांसह वहाणे यांना विशाळगड येथील सद्यःस्थिती निदर्शनास आणून दिली होती.
३. यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रत्यक्ष कार्यवाही होऊ शकली नव्हती. आता जून मासाच्या पहिल्या आठवड्यात विलास वहाणे यांनी विशाळगडावर जाऊन पहाणी करून अतिक्रमणधारकांना नोटिसा देणे, हा ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने उभ्या केलेल्या आंदोलनाचाच एक परिणाम आहे, अशी प्रतिक्रिया श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे.
केवळ नोटिसा न देता सर्व अतिक्रमण समयमर्यादेत हटवावीत ! – श्री. सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती
कोल्हापूर – विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांच्या संदर्भात पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी भेट देऊन तेथे अतिक्रमणे करणार्या १२ लोकांना नोटिसा दिल्या. गेली १७ वर्षे कोणतीच कृती न करणार्या पुरातत्व विभागाने किमान अतिक्रमणांच्या संदर्भात पहाणी करून नोटिसा देणे, ही समाधानाची गोष्ट आहे; मात्र विशाळगडावर वर्ष १९९८ पासून मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे पहाता गडावर ६४ मोठी आणि नव्याने बांधकाम झालेली ४५ छोटी अतिक्रमणे आहेत. त्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे पुरातत्व खात्याने याकडे दुर्लक्ष केल्याने हा गड आज अतिक्रमणांच्या विळख्यात आहे आणि तेथील मंदिरे अन् नरवीरांच्या समाध्या दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने केवळ नोटिसा देण्यावर समाधान न मानता कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी मागणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिद्धीपत्रात श्री. घनवट यांनी म्हटले आहे की,
१. माहितीच्या अधिकारात यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि बांधकामे झालेली आहेत’, असे पुरातत्व विभागानेच मान्य केले आहे. विशाळगड हा वर्ष १९९८ पासून पुरातत्व विभागाकडे असून यातील काही भूमी जरी वनविभागाकडे असली, तरी या गडावर होणार्या कोणत्याही अतिक्रमणास अंतिमत: पुरातत्व विभागाच उत्तरदायी आहे.
२. या गडावर मुख्यत्वे रेहानबाबाच्या दर्ग्यासह जी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत, ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग काय करणार आहे ? हेही विभागाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. यातील काही अतिक्रमणे जरी वनविभागाच्या अंतर्गत येत असली, तरी या दोन्ही विभागांनी समन्वय साधून गडावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी पाठपुरावा घेणे आवश्यक आहे.
३. गेल्या १७ वर्षांत पुरातत्व विभागाने अतिक्रमणांना केवळ नोटीस देण्याच्या पलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे या वेळी केवळ नोटीस देण्यापुरते मर्यादित न रहाता ही संपूर्ण अतिक्रमणे हटवेपर्यंत त्याचा पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. याच समवेत गडाची ग्रामदेवता असणार्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा, तसेच स्मारके, समाध्या, गडाची आणि तटबंदीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही या निमित्ताने आम्ही करत आहोत.