नगर येथील रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र प्रविष्ट

डावीकडून आरोपी बाळ बोठे आणि रेखा जरे

नगर – येथील रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे यांचे जरे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांचे वाद झाले. यामुळे अपकीर्ती होण्याच्या भीतीने बोठे यांनी ही हत्या घडवून आणल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक दोषारोपपत्र पूर्वीच प्रविष्ट झालेले आहे. बोठे यांचा ‘आयफोन’ मात्र अद्याप प्रयोगशाळेतून पडताळून आलेला नाही.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० या दिवशी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रारंभीच ५ आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाले होते. त्यामुळे आधी अटक केलेल्या ५ आरोपींविरुद्ध पारनेरच्या न्यायालयात पहिले दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. बोठे यांना अनुमाने १०२ दिवसांनंतर भाग्यनगर येथून अटक करण्यात आली होती. सध्या ते पारनेर येथील कारागृहातच न्यायालयीन कोठडीत आहेत.