परशुराम सेवा संघाचे मराठवाडा मार्गदर्शक प्रशांत सुलाखे यांची मागणी
भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्याची मागणी करणार्या श्री. प्रशांत सुलाखे यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श घेऊन सर्वच हिंदूंनी असे प्रयत्न करणे काळाची आवश्यकता आहे !
बीड, ८ जून (वार्ता.) – भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याच्या दृष्टीने देशातील मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणी मदरशांप्रमाणेच भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्यास प्रारंभ करावा. केंद्र शासनासमवेतच राज्यशासनानेही यांसाठी ५० टक्के अनुदान द्यावे, तसे केल्यास ज्या विद्यार्थ्यांना वेद शिक्षण किंवा धार्मिक शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे शिक्षण महत्त्वाचे ठरेल. शासनाने या शिक्षणास त्वरित संमती देऊन संपूर्ण देशात त्याची कार्यवाही चालू करावी, अशी मागणी परशुराम सेवा संघाचे मराठवाडा मार्गदर्शक प्रशांत सुलाखे यांनी केली आहे.
श्री. प्रशांत सुलाखे यांनी म्हटले आहे की,
१. भारतीय संस्कृतीचे जतन, प्रसार आणि प्रचार करून शालेय मुलांना शिक्षणासमवेत आपल्या संस्कृतीचे शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये संस्कृत, वेद शिक्षण, धर्म ग्रंथांचा अभ्यास, प्रवचन, वारकरी संप्रदायाचे शिक्षण, तसेच भारतीय पारंपरिक संस्कृतीचे शिक्षण देण्यात यावे.
२. शाळेत मुलांना चारही वेदांचा अभ्यासक्रम शिकवण्यात यावा. वेद शास्त्रात पारंगत असणार्या व्यक्तींची याठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, मदरशांप्रमाणेच या संस्थेस शासकीय अनुदान देण्यात यावे, तसेच शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे.