मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

  • उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !

  • राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

खासदार नवनीत राणा

अमरावती – येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राविषयी आक्षेप नोंदवत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर ८ जून या दिवशी सुनावणी करतांना न्यायालयाने खासदार राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करून २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर खासदार नवनीत राणा यांनी ‘मी न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जाईन’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

१. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

२. निकालानंतर आनंदराव अडसूळ यांनी खासदार राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

३. उच्च न्यायालयाने ‘हा राज्यघटनेवरील घोटाळा आहे’, असे मत नोंदवून जात प्रमाणपत्र रहित करून वरील दंड ठोठावला, तसेच खोटे जात प्रमाणपत्र ६ सप्ताहांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

४. या प्रकरणात राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर प्रविष्ट केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती मागणी उच्च न्यायालयाकडूनही मान्य करण्यात आली. तसेच मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता.

५. या प्रकरणी सुनावणी देतांना न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार ! – नवनीत राणा, खासदार

अमरावती – मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविषयी ८ जून या दिवशी नवी देहली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘यामागे काहीतरी राजकीय खिचडी शिजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करत असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’’