भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे अनेक कुटुंबांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण !

नागपूर येथे ५ मासांत ७०४ तक्रारी !

भ्रमणभाषचा असाही एक दुष्परिणाम ! भ्रमणभाषवर योगा, देवता आणि संत यांचे, तसेच शौर्यजागृती करणारे चित्रपट, आध्यात्मिक सत्संग अशा चांगल्या गोष्टी पाहूनही जीवनात आनंद प्राप्त करून घेता येतो; मात्र भ्रमणभाषवर अनावश्यक आणि वाईट गोष्टी पाहिल्यास त्याचा मनावर परिणाम होऊन कुटुंबांमध्ये कलह निर्माण होतो. यासाठी सर्वांनीच भ्रमणभाषचा योग्य वापर केल्यास उचित ठरेल !

नागपूर – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आणि दळणवळण बंदीच्या काळात लोक घरातच असल्याने त्यांनी भ्रमणभाषवर अधिकाधिक वेळ बोलणे, संभाषण (चॅटिंग) करणे, तसेच सामाजिक माध्यमांचा अतीवापर करणे यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे (पती-पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी स्थापन केलेला कक्ष) मागील ५ मासांत अशा स्वरूपाच्या ७०४ तक्रारी, तर केवळ २ मासांत २३६ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे पती-पत्नीत वितुष्ट !

भ्रमणभाषवर अधिक वेळ घालवणे किंवा सामाजिक माध्यमांचा अतीवापर केल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊन वितुष्ट निर्माण झाले आहे. तशा काही तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे सामाजिक माध्यमांच्या अपवापरामुळे दांपत्यांमध्ये संशयही निर्माण होत आहे.

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे समस्या निर्माण झाल्या ! – अजित पारस, तज्ञ, सामाजिक माध्यम

‘भरोसा सेल’कडे आलेल्या ७०४ तक्रारींचे विश्‍लेषण सामाजिक माध्यमांच्या तज्ञांनी केले आहे. ‘भ्रमणभाषचा अतीवापर त्याला कारणीभूत आहे’, असे या तज्ञांचे मत आहे. ‘भ्रमणभाष हा सुखी संसारात विष कालवत असून याला लोकांची मानसिकता उत्तरदायी आहे. भ्रमणभाषचा प्रमाणाबाहेर वापर करणे यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे’, असे सामाजिक माध्यमांचे तज्ञ अजित पारसे यांनी सांगितले आहे.

पती-पत्नीने एकमेकांना वेळ द्यावा !

‘या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी, तसेच सुखी संसार हवा असेल, तर घरात भ्रमणभाषचा अतीवापर करणे थांबवायला हवे, तसेच भ्रमणभाषच्या वापरामुळे निर्माण झालेले अपसमज दूर करावेत. एकमेकांवर विश्‍वास दाखवावा. तसेच घरी असतांना पती-पत्नीने एकमेकांना वेळ द्यावा. या सर्व गोष्टींमुळे भ्रमणभाषच नाही, तर दुसरी कोणतीही गोष्ट सुखी संसारात विष कालवू शकणार नाही’, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.