कल्याण येथे बनावट निवडणूक ओळखपत्रांचा साठा हस्तगत !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ५ जून (वार्ता.) – कल्याण (पश्‍चिम) येथील खडकपाडा भागातील माधव संसार या इमारतीमधील बी २ या खोलीमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणार्‍या निवडणूक मतदार ओळखपत्रासारख्या बनावट कोर्‍या निवडणूक मतदार ओळखपत्रांचा साठा सापडला आहे. कल्याणमधील नायब तहसीलदार वर्षा थळकर यांनी याप्रकरणी कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे. त्याच्या घरातून ४०० ते ५०० बनावट कोरी मतदार ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर २०२० या कालावधीत नगरसेवकांची राजवट संपुष्टात आली; मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टीकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्रे सिद्ध केली गेली आहेत.