सरपंचांच्या चेतावणीनंतर प्रशासनाकडून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिका सुपुर्द

प्रशासनाला चेतावणी किंवा आंदोलन यांचीच भाषा समजते का ? त्याशिवाय काम न करणार्‍या असंवेदनशील प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

सावंतवाडी – सद्य:स्थितीत जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असतांना, तसेच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना रुग्णांच्या सेवेसाठी खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ‘पासिंग’ करून न घेतल्याने गेले ५ ते ६ दिवस मुख्यालयात उभ्या करून ठेवल्या होत्या. यातील एक रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी संमत करण्यात आली होती; मात्र या रुग्णवाहिकेचे ‘पासिंग’ न झाल्याने ती मिळू शकली नव्हती. (सध्याच्या आपत्काळात रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असतांना उपप्रादेशिक परिवहन विभाग रुग्णवाहिका ५-६ दिवस मुख्यालयात उभ्या कशा काय ठेवू शकतो ? जनतेप्रती असंवेदनशीलता आणि परिस्थितीचे गांभीर्य नसणे यालाच म्हणतात ! – संपादक) त्यामुळे ४ जूनपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली नाही, तर ५ जूनला मुख्यालयात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेच्या टपावर बसून आंदोलन करू, अशी चेतावणी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत मराठे यांनी २ दिवसांपूर्वी प्रशासनाला दिली होती. त्यानंतर ४ जूनला सायंकाळी १ रुग्णवाहिका मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपुर्द करण्यात आली.

याविषयी सरपंच मराठे म्हणाले, ‘‘या प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता होती. ती नवीन रुग्णवाहिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महिला अन् बालकल्याण सभापती यांचे आभार मानतो.’’


सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे नवीन ६४५ रुग्ण

१. एकूण रुग्ण – २९ सहस्र ५९०

२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण – १३

३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण – ७४४

४. बरे झालेले रुग्ण – २२ सहस्र ६४४

५. उपचार चालू असलेले रुग्ण – ६ सहस्र ११९