उपमुख्यमंत्री आणि वारकरी प्रतिनिधी यांची पुणे येथे बैठक
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पायी वारीचा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शासकीय अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही समिती सर्व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करून पायी वारीविषयी आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे येथे ४ जून या दिवशी झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. राणा महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे पदाधिकारी, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. भाऊसाहेब गोसावी महाराज, राजाभाऊ चोपदार या प्रमुख मान्यवरांसह विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे येथील जिल्हाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मानाच्या प्रमुख पालख्यांची पायी वारीची शेकडो वर्षांची परंपरा असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून पायी वारीस अनुमती मिळावी, अशी आग्रही मागणी उपस्थित वारकरी संप्रदायातील मंडळींनी या वेळी केली. या समितीसमोर वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळी आपली मते आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी यात्रा कशी पार पाडता येईल ? याचा आराखडा सादर करतील. त्यावर अधिकार्यांच्या शिफारसीसह तो आराखडा शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.