राष्ट्राचा आधार होण्यासाठी स्वत:तील असामान्यत्व ओळखा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. निरंजन चोडणकर

रत्नागिरी, २९ मे (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वराज्यावरचे आक्रमण, हे स्वत:वरील आक्रमण आहे, असे समजून लढले. आज आपल्यालाही देव, देश आणि धर्म यांवरील आक्रमण म्हणजे स्वत:वरील आक्रमण आहे, असे वाटले पाहिजे. आज मंदिर रक्षण, गोरक्षण, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करायला हवा. पूर्वी कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण झाले, तर रक्षणासाठी भारतियांचे साहाय्य घेतले जायचे; कारण भारत विजयश्री मिळवणार्‍या योद्धांची भूमी आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी स्वत:तील असामान्यत्व ओळखून, ‘कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळले, तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन आणि माझ्या भारतभूला स्वतंत्र करीन’, असे इंग्रजाना ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे आज आपल्यालाही राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध होण्याची आवश्यकता आहे. भारतीय सैन्य बाह्य शत्रूंशी लढण्यासाठी सक्षम आहे; मात्र अंतर्गत कलहांवरून निर्माण होणार्‍या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, राष्ट्राचा आधार होण्यासाठी स्वत:तील असामान्यत्व ओळखा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. २७ मे २०२१ या दिवशी रत्नागिरी येथे सायंकाळी ७ वाजता ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आलेल्या शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. मृण्मयी कात्रे यांनी केले, तर या व्याख्यानाचा उद्देश कु. सुवर्णा सकपाळ यांनी सांगितला.

श्री. निरंजन चोडणकर पुढे म्हणाले,

१. काही दशकांपूर्वी इंग्रजानी भारतियांचा पराक्रम जाणून आमच्या हातातील शस्त्रे काढून घेतली आणि उरली-सुरली मनातील शस्त्रे अहिंसेच्या नावाखाली मोहनदास गांधीनी काढून घेतली. त्याचेच परिणाम आपण आज भोगत आहोत.

२. या परिस्थितीवरचा उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होण्याची अधिक आवश्यकता आहे.

३. छत्रपती शिवरायांप्रमाणे ‘भक्ती हीच शक्ती’ हे जाणून भगवंताच्या साहाय्याने पुन्हा भारताला विश्वगुरु करण्यासाठी हिंदूसंघटनाची ताकद जाणून एकत्र येऊया.

४. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम होऊया.