मुंबई – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजना उत्तम असून त्यानुसार राज्यात कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी अन्य महापालिकेच्या आयुक्तांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांना ‘मुंबई मॉडेल’ची माहिती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने १३ मे या दिवशी दिले होते; मात्र ‘अद्याप अशी बैठक का झाली नाही ?’, अशी विचारणाही न्यायालयाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडे केली. त्यावर ‘लवकरच अशी बैठक आयोजित करू’, असे आश्वासन राज्यशासनाच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिले.
‘मुंबई महापालिकेचे सर्व नियोजन प्रारंभीपासून प्रभावी ठरत असल्याने तीच पद्धत इतर ठिकाणी वापरल्यास कोरोनावर मात करण्यास सहाय्यभूत ठरू शकते’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.