तौक्ते चक्रीवादळातील हानीग्रस्तांना २५० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्याचा राज्यशासनाचा निर्णय ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

विजय वडेट्टीवार

मुंबई – मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठी हानी झाली आहे. यातील हानीग्रस्तांना राज्यशासनाने २५० कोटी रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे साहाय्य आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे.

या वेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषांच्या पलीकडे जाऊन राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या निकषानुसार तौक्ते चक्रीवादळामुळे ७२ कोटी रुपयांची हानी झाली आहे. भविष्यात वादळांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये वीजेच्या भूमीगत वायर टाकण्यात येणार आहेत, तसेच निवारेही बांधण्यात येणार आहेत.’’