इयत्ता १० वीची परीक्षा रहित केल्यावरून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आमदार सुदिन ढवळीकर यांची अप्रसन्नता !

सुदिन ढवळीकर

पणजी, २५ मे (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा शासनाने गोवा शालांत मंडळाची इयत्ता १० वी परीक्षा रहित करून विद्यार्थ्यांचे आतंरिक गुणांवर मुल्यांकन करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यार्थीवर्गावर मोठा अन्याय ! – लक्ष्मीकांत पार्सेकर

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले, ‘‘शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्वत:चे मूल्यांकन करण्याची महत्त्वाची संधी गमावली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थीवर्गावर मोठा अन्याय झाला आहे. इयत्ता ८ वीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पाठवले जाते. गतवर्षी इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनाही १० वीच्या वर्गात पाठवण्यात आले; मात्र कोरोनाचा संसर्ग पहाता राज्यशासनाकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, हेही खरे आहे. राज्यशासनाने इयत्ता १२ वीच्या गोवा शालांत मंडळाच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रहित करू नये.’’

हुशार विद्यार्थ्यांवर हा अन्याय ! – सुदिन ढवळीकर

मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘इयत्ता १० वीची परीक्षा रहित करण्याचा गोवा शासनाचा निर्णय धक्कादायक आहे. हुशार विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. या निर्णयामुळे मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात.’’