वैशाख पौर्णिमा या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण

वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही. 

सौ. प्राजक्ता जोशी

१. ग्रहण दिसणारे प्रदेश  

‘हे चंद्रग्रहण आशिया खंडातील पूर्वेकडील प्रदेश, ईशान्य भारत, चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, श्रीलंका, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅनडा या प्रदेशात दिसणार आहे.

​हे खग्रास चंद्रग्रहण असून भारताच्या अति पूर्वेकडील / ईशान्य भागातून हे ग्रहण काही ठिकाणी ग्रस्तोदित, तर काही ठिकाणी खंडग्रास दिसणार आहे. उर्वरित भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. भारतातील ग्रहण दिसणार्‍या भागातून ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नसून सायंकाळी ६.२३ वाजता केवळ ग्रहण मोक्ष दिसणार आहे. त्या त्या गावाच्या सूर्यास्तानंतर मोक्षापर्यंत ग्रहण पहाता येईल.​

२. ग्रहण दिसणारी काही प्रमुख गावे

ओडिशा राज्यातील पुरी, भुवनेश्‍वर, कटक, पश्‍चिम बंगालमधील कोलकाता, जलपायगुडी, सिलिगुडी, संपूर्ण अंदमान निकोबार बेटे, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅण्ड, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर इत्यादी प्रदेशांत खंडग्रास ग्रहण दिसणार असून उर्वरित भारतामध्ये ग्रहण दिसणार नाही.

३. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

३ अ. स्पर्श (आरंभ) : २६.५.२०२१ दुपारी ३.१५

३ आ. मध्य : २६.५.२०२१ सायंकाळी ४.४९

३ इ. मोक्ष (शेवट) : २६.५.२०२१ सायंकाळी ६.२३

३ ई. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहण आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : ३ घंटे ८ मिनिटे’

टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (५.५.२०२१)