आषाढीवारीसाठी संतांच्या पालख्या पायीच नेण्याची वारकर्‍यांची आग्रही मागणी !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे – गतवर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संतांच्या पालख्या राज्य सरकारने विशेष बसने पंढरपूर येथे आणल्या होत्या. यंदाही याच प्रकारे सर्व संतांच्या पालख्या विशेष बसने पंढरपूर येथे नेण्याचा विश्‍वस्तांचा विचार आहे. याला राज्यातील अनेक वारकरी, दिंडीकरी, फडकरी संघटना यांचा विरोध असून आषाढी वारीसाठी सर्व संतांच्या पालख्या पायीच नेण्याची आग्रही मागणी वारकर्‍यांनी केली आहे.

देशात कोरोना असतांना अनेक राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या, तेथे लाखोंच्या जाहीर सभा झाल्या. कुंभमेळा मोठ्या प्रमाणात झाला. राज्यातही पोट- निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभा झाल्या. राजकीय दौरे होतात; परंतु संतांच्या पालख्या सर्व नियमांचे पालन करून पायी का जाऊ शकत नाहीत ? अशी विचारणा वारकरी करत आहेत. या संदर्भात श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यातील सर्व घटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. थोडक्या स्वरूपात का होईना, पायी वारी झाली पाहिजे, याविषयी आम्ही आग्रही आहोत.’’

यासंदर्भात आळंदी येथील श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानने पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिक यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की,

१.  कोरोनाच्या संसर्गाच्या संदर्भातील सध्याची परिस्थिती आणि सोहळ्याचा मुक्काम आपल्या गावी असेल, त्या वेळेची संभाव्य परिस्थिती याचा साधक-बाधक विचार करता आषाढीवारीचे स्वरूप यंदा कसे असावे ? या संदर्भात आपली भूमिका आपण संस्थान समितीस तात्काळ कळवावी.

२. यंदाचा आषाढी सोहळा पायी वारीच्या स्वरूपात असावा का ? सोहळ्यामधील वारकरी भाविकांची संख्या किती असावी ? किती संख्येपर्यंत वारकरी आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रात येणे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपणास योग्य आणि सुरक्षित वाटते ?

३. मुक्कामाच्या तळावर आपण कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता ?