साधकसंख्या अल्प असूनही भावपूर्ण आणि तळमळीने गुरुकार्याची धुरा सांभाळणारे अयोध्या येथील पू. डॉ. नंदकिशोर वेद !

‘डॉ. नंदकिशोर वेद यांच्याशी गेली जवळपास १७ वर्षे आमचे जवळचे संबंध होते. आम्ही सर्वजण त्यांना प्रेमाने ‘नंदकिशोरकाका’ म्हणायचो. मी उत्तरभारतमध्ये सेवेला असल्यापासून ते अयोध्या येथील केंद्राचे दायित्व पहात होते. त्यामुळे विविध सेवांच्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क व्हायचा. अयोध्या येथील साकेत महाविद्यालयात ते प्राध्यापक असल्याने समाजात ते सन्माननीय व्यक्ती म्हणून परिचित होते. डॉ. नंदकिशोर वेद यांचे ११.५.२०२१ या दिवशी देहावसान झाले. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांचा आज निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक संकलित केलेली सूत्रेे येथे दिली आहेत.

१. अयोध्या येथील वेद कुटुंबीय गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित असणे आणि त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर आश्रमात गेल्याचा आनंद अन् प्रेम मिळणे

‘स्वतःच्या निवासस्थानाचा आश्रम कसा बनवायचा ?’, याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे डॉ. नंदकिशोर वेद. ते आणि त्यांचा परिवार यांच्या भावामुळे त्यांनी घरात आश्रमासारखे वातावरण निर्माण केले होते. सनातनचे संत किंवा साधक प्रसाराच्या उद्देशाने अयोध्या येथे गेल्यास सर्वांच्या निवासाची सोय आणि अन्य व्यवस्था त्यांच्याच निवासस्थानी असायची. त्यांचा पूर्ण परिवार साधना करत आहे. त्यांचे कुटुंब हे अयोध्या येथील गुरुकार्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांच्या निवासस्थानी गेल्यावर आश्रमात गेल्याचा आनंद आणि प्रेम मिळते.

२. प्रसारदौरा चालू झाल्यावर त्यांचे आश्रमरूपी निवासस्थान केंद्र असणे

आमचा प्रसारदौरा चालू झाला की, त्यांचे आश्रमरूपी निवासस्थान आमचे केंद्र असायचे. आम्ही ३-४ जण त्यांच्या घरी गेल्यावर ते स्वतः लक्ष घालून आमची रहाण्याची, न्याहारी, भोजन इत्यादी व्यवस्था भावपूर्ण करायचे. ‘आम्हाला काहीच न्यून पडू नये’, अशी व्यवस्था ते तळमळीने आणि प्रेमाने करायचे. त्यात कुणी साधक आजारी पडला, तर त्याला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जाणे, औषधोपचार करणे हेही ते तेवढ्याच दायित्वाने पहायचे.

३. सात्त्विक उत्पादनांचे ते स्वतःच स्थानिक वितरक असणे

त्यांना पाठ आणि कंबर दुखण्याचा त्रास तीव्र होता, तरी केंद्रासाठी आलेला ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा, सात्त्विक उत्पादने यांची पार्सले बसस्थानकावर जाऊन घेणे, ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अशा सेवा ते वेळेत करायचे. सात्त्विक उत्पादनांचे ते स्वतःच स्थानिक वितरक होते. त्यामुळे त्याचा साठाही त्यांच्या निवासस्थानी असायचा. ते स्वतः त्याचे साधकांना आणि समाजात वितरण करायचे. अयोध्या येथे साधकसंख्या अल्प असल्याने दायित्व घेऊन प्रसारकार्य पहाणारे अन्य कुणी नव्हते. त्यामुळे प्रसाराच्या संदर्भातील सर्व सूचना ते कृतीत आणायचा प्रयत्न करायचे.

४. स्वतःच्या चारचाकी वाहनाने ७ घंट्यांचा प्रवास करून उत्साहाने वाराणसीला येणे आणि तेथील सेवाही आवश्यक तेवढे दिवस राहून पूर्ण करणे

वाराणसी येथील सेवाक्रेंद्रात साधकांची शिबिरे, हिंदु राष्ट्र (कलियुगांतर्गत सत्ययुग) अधिवेशन, गुरुपौर्णिमा महोत्सव, धर्मप्रेमी कार्यशाळा इत्यादी आयोजन झाल्यावर नंदकिशोरकाका यांच्यासाठी एखादी विशेष सेवा ठरलेली असायची. त्यासाठी ते सहपरिवार स्वतःच्या चारचाकी वाहनाने ७ घंट्यांचा प्रवास करून उत्साहाने वाराणसीला यायचे आणि आवश्यक तेवढे दिवस राहून सेवा पूर्ण करून जायचे. त्यांना शारीरिक त्रास असल्याने ते अयोध्येहून येतांना आणि जातांना एक वाहनचालक घेऊन यायचे. वाराणसीला आल्यावर ते त्यांचे चारचाकी वाहन आश्रमसेवेसाठी उपलब्ध करून द्यायचे.

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी हिंदु धर्माभिमान्यांना निमंत्रण देतांना  १. पू. डॉ. नंदकिशोर वेद (वर्ष २०१८)

५. शारीरिक त्रास असतांनाही प्रसारदौर्‍यावर येण्याच्या संदर्भात विशेष उत्साही असणे आणि दौर्‍याच्या वेळी निरपेक्षभावाने मिळेल त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेणे

शारीरिक त्रास असतांनाही प्रसारदौर्‍यावर येण्याच्या संदर्भात ते विशेष उत्साही असायचे. आम्ही अयोध्या येथे गेल्यावर तिथूनच त्यांचे चारचाकी वाहन घेऊन लखनऊ, कानपूर, सुलतानपूर अशा ठिकाणी प्रसारासाठी जायचो. तेव्हा नंदकिशोरकाकाही आमच्या समवेत असायचे. त्यांना त्या भागातील भौगोलिक अभ्यासही चांगला होता. त्याचाही उपयोग प्रसारासाठी व्हायचा. त्यांना शारीरिक त्रास असतांनाही दौर्‍याच्या वेळी ते निरपेक्षभावाने मिळेल त्या परिस्थितीत स्वतःला सामावून घ्यायचे, हे विशेष होते.

६. श्री. प्रशांत जुवेकर (श्री. वेदकाका यांचे जावई) यांना मडगाव स्फोट प्रकरणाच्या (खोट्या) आरोपाखाली अटक केली असता त्यांनी या कठीण प्रसंगी जराही न डगमगता स्थिर राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून परिवाराला आधार देणे

त्यांचे जावई श्री. प्रशांत जुवेकर यांना मडगाव स्फोट प्रकरणाच्या (खोट्या) आरोपाखाली अटक केली होती. तेव्हा त्यांची कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. प्रशांत यांचा विवाह होऊन काही मासच झाले होते. अशा कठीण प्रसंगीही ते डगमगले नाहीत आणि त्यांची श्रद्धा किंचितही ढळली नाही. त्याही वेळी त्यांनी स्थिर राहून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून परिवाराला आधार दिला अन् स्वतःची साधना आणि सर्व प्रकारच्या सत्सेवा चालू ठेवल्या. त्या कालावधीतही त्यांच्या घरी सनातनचे संत किंवा साधक गेल्यास त्यांनी परिवारासह मनापासून सेवा केली.

७. सनातनच्या हिंदी भाषेतील ग्रंथनिर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा असणे आणि अनेक ग्रंथांचे व्याकरण अन् मुद्रितशोधन पडताळण्याची सेवा करणे

नंदकिशोरकाका यांचे हिंदी भाषा आणि व्याकरण यांवर विशेष प्रभुत्व होते. यामुळे सनातनच्या हिंदी भाषेतील ग्रंथनिर्मितीच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अनेक हिंदी ग्रंथांचे व्याकरण आणि मुद्रितशोधन पडताळण्याची सेवाही त्यांनी केली आहे.

८. सर्व साधकांचा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन साप्ताहिक व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे घेणे आणि प्रकृती ठीक नसतांनाही ठरलेल्या दिवशी साधकांचा आढावा घेऊन स्वतःच्या साधनेचाही आढावा देणे

अयोध्या केंद्रात साधकसंख्या अल्प असली, तरी ते सर्व साधकांचा प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन साप्ताहिक व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे घेत होते. तसेच स्वतःच्या व्यष्टी साधनेचा आढावाही साधकांना द्यायचे. एकदा आम्ही दौर्‍यावर होतो आणि त्यांची प्रकृती बिघडली होती, तरी त्यांनी ठरलेल्या दिवशी साधकांच्या साधनेचा आढावा घेतला आणि स्वतःचाही आढावा त्यांना सांगितला. याद्वारे त्यांनी सर्व साधकांच्या मनावर व्यष्टी साधना आणि साधनेतील सातत्य ठेवणे हा संस्कार दृढ केला.

९. एकदा प्रसारदौर्‍यावर असतांना साधकाची प्रकृती बिघडल्यावर वेदकाकांनी अधिक वेळ गाडी चालवणे अन् त्या वेळी ते उत्साही अन् आनंदी असणे

एकदा प्रसारदौर्‍यावर असतांना आम्हाला ‘कानपूर ते अयोध्या’, असा चारचाकीने रात्रीचा प्रवास करायचा होता. त्या वेळी माझी प्रकृती फार बिघडली होती. प्रवास चालू झाल्यावर ती आणखी बिघडली. हायवे असल्याने रात्री बरीच मोठी वाहने ये-जा करत होती. त्यामुळे चार घंट्यांचा प्रवास सात घंट्यांचा झाला. तेव्हा मला त्रास होऊ नये; म्हणून काकांनी जवळपास साडेचार ते पाच घंटे स्वतः वाहन चालवले. त्या वेळी ते उत्साही, आनंदी आणि निरपेक्ष होते.’

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी सेवाकेंद्र, (१५.५.२०२१)

समाजात मानाचे स्थान असूनही धर्मप्रसाराच्या उद्देशाने समाजात जाऊन अर्पण गोळा करण्यामध्ये त्यांना जराही अहं नसणे

समाजात त्यांना मानाचे स्थान होते, तरी धर्मप्रसाराच्या उद्देशाने समाजात जाऊन अर्पण गोळा करणे, गुरुपौर्णिमेसाठी विज्ञापने घेणे या सेवा ते स्वतः करायचे आणि या संदर्भात केंद्रातील पुढील दायित्वाचा भाग ते स्वतःच पूर्ण करून पाठवत असत. गुरुपौर्णिमा स्मरणिकेसाठी ते एकटेच चाळीस ते पंचेचाळीस विज्ञापने आणायचे. अयोध्या केंद्रात धर्मप्रेमींची एखादी कार्यशाळा, गुरुपौर्णिमा महोत्सव असे कार्यक्रम ठरल्यास समाजातून सभागृह, भोजन इत्यादींचे प्रायोजक मिळवणे इत्यादीही सेवा ते करायचे. समाजात मानाचे स्थान असतांनाही त्यांना त्याचा अहं नव्हता. अयोध्या येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक, हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे  हितचिंतक यांच्या समवेत त्यांचे आदरपूर्वक अन् प्रेमपूर्वक संबंध होते.