अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावरील घटना दुर्दैवी ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील

नागपूर – ‘तौक्ते’ वादळामुळे अरबी समुद्रातील ‘बार्ज ३०५’ या जहाजावर झालेली घटना दुर्दैवी आहे. या वादळामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेविषयी केंद्र सरकारने चौकशीचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात जी काही कारवाई आवश्यक असेल, ती होईलच; मात्र एवढ्या लोकांचा मृत्यू होणे, ही शोभणारी गोष्ट नाही. सर्व ठिकाणी अतीदक्षतेची चेतावणी दिलेली होती. नियोजनही चांगले होते, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २१ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

ते पुढे म्हणाले की,

१. केंद्र सरकारने गुजरात राज्यात ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीसाठी साहाय्य केले आहे. याविषयी तक्रार असण्याचे कारण नाही; पण मागील काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वादळामुळे हानी झाली आहे.

२. या वेळी ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीत ३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रालाही साहाय्य केले पाहिजे.

३. मराठा आरक्षणाविषयी ते म्हणाले की, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरक्षणाविषयीचा लढा देण्यासाठी उपसमिती नेमली आहे.

४. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका प्रविष्ट करण्याविषयी पुढील निर्णय घेईल.

५. मुंबई येथे पंतप्रधानांविषयी झालेली फलकबाजी हा पोलीस आयुक्त पातळीवरील विषय असल्याने त्याविषयी मी बोलणे योग्य ठरणार नाही.