बेळगाव येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज यांचा देहत्याग !

प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज

बेळगाव –  संत साहित्याचे गाढे अभ्यासक प.पू. डॉ. वा.पु. गिंडे महाराज (वय ८५ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी बाजार गल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. प.पू. डॉ. गिंडे महाराज हे साहित्यक्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्त्व होते.

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांनी केलेले विपुल लेखन !

नागपूर विद्यापिठात त्यांनी अतिथी प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले होते. पुणे येथे झालेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषेदेत ‘अमृतानुभवाचे तत्त्वज्ञान’ यावर त्यांनी निबंधवाचन केले होते. कल्लोळ अमृताचे, ज्ञानेश्‍वरीतील एक रसतीर्थ, स्फटिक गृहीचे दीप, हरिपाठ चिंतन, वर्षे अमृताचा धनु, ज्ञानेश्‍वरी अध्याय १, २, ७, ९, चांगदेव पासष्टी, वारकरी संप्रदायाची प्रस्थान त्रयी, ज्ञानेश्‍वरांची प्रतिज्ञोत्तरे, मराठीतील स्वयंवर आणि नाथांचे रुक्मिणी स्वयंवर अशी त्यांची काही मुख्य लेखन संपदा आहे.

संतसाहित्यावर विपुल लिखाण करून अध्यात्माचे ज्ञानामृत समाजाला देणारे प.पू. डॉ. गिंडे महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

‘प.पू. डॉ. गिंडे महाराज हे संतसाहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांना वाङ्मयात डॉक्टरेट मिळाली होती. साहित्यक्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. समाजात नावलौकिक असूनही ते अतिशय विनम्र होते. प.पू. डॉ. गिंडे महाराज यांनी संसारात राहून साधना केली आणि संतपद गाठले. असे करणे पुष्कळ कठीण असते; मात्र त्यांनी ते साध्य केले. ते नेहमी म्हणत, ‘ज्ञानेश्‍वरीने मला जगण्याचे प्रयोजन आणि बळ दिले.’ त्यांनी ज्ञानेश्‍वरी केवळ अभ्यासली नाही, तर त्यातील शिकवणीनुसार आचरणही केले. त्यांनी समाजप्रबोधनाचेही कार्य केले. अध्यात्मातील ज्ञानामृताचा समाजाला लाभ व्हावा आणि सर्वांनी साधना करावी, यासाठी त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने अन् प्रवचने घेतली. ते आदर्श शिक्षकही होते. पुढील पिढी सशक्त आणि सुसंस्कारी व्हावी, अशी त्यांना तळमळ होती.

प.पू. डॉ. गिंडे महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अधूनमधून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला येत. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मला माहेरी आल्यासारखे वाटते’, असे ते सांगत. त्यांनी सनातनच्या साधकांना भरभरून प्रेम दिले.

ज्ञानवंत असूनही समाजाला कळेल, अशा सोप्या भाषेत अध्यात्माचा प्रसार करणारे प.पू. डॉ. गिंडे महाराज यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार साधना करणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.