उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. हृषिकेश विशाल पवार हा आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. हृषिकेश विशाल पवार याचा आज वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (१९ मे २०२१) या दिवशी दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याचे वडील सनातनचे साधक श्री. विशाल पवार आणि त्याची आई सौ. वैदेही पवार यांनी चि. हृषिकेशच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतरचे केलेले लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत.
चि. हृषिकेश विशाल पवार यास वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेले आई-वडील आणि सात्त्विक बाळ यांच्या संदर्भातील एक अभूतपूर्व उदाहरण !‘आई-वडील सात्त्विक असले, तर त्यांच्यापोटी सात्त्विक बाळ जन्माला येते. असे सर्वसाधारणपणे घडते. आई-वडिलांना अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असूनही त्यांच्या पोटी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सात्त्विक बाळ जन्माला येणे आणि ते आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्या आई-वडिलांना बाळाच्या केवळ अस्तित्वाने आध्यात्मिक लाभ होणे, हे अभूतपूर्व आहे. इतिहासात असे उदाहरण वाचायला मिळालेले नाही. हे उदाहरण आम्हाला सविस्तर माहितीसह दिल्याविषयी श्री. विशाल आणि सौ. वैदेही पवार यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. ‘बाळामुळे विशाल आणि सौ. वैदेही यांची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉक्टर आठवले |
चि. हृषिकेशचे वडील श्री. विशाल पवार यांचा थोडक्यात परिचय
वर्ष १९९७ मध्ये ‘इयत्ता ७ वी पर्यंत मला काही त्रास नव्हता. तेव्हा मी बालसाधक होतो. माझे वय १२ वर्षे होते. नामजप करणे, ग्रंथवाचन करणे हे माझे मामा-मामी माझ्याकडून करून घेत असत. त्या वेळी मी केवळ शिष्य हा ग्रंथ वाचला होता. ग्रंथ वाचल्यावर मला ‘साधना आणि साधनाच करायला पाहिजे’, असे वाटू लागले. वर्ष १९९८ मध्ये श्री. चंद्रशेखर नाईक यांची सार्वजनिक सभा होती. सभा आवडल्यामुळे मी साधना चालू केली. वर्ष २००४ – २००५ मध्ये उज्जैन येथील कुंभमेळा होता. मी तेथे सेवेला गेलो आणि त्यानंतर मी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. वर्ष २००० पासून आध्यात्मिक त्रास होण्यास आरंभ झाला. वर्ष २०१३ मध्ये आई आजारी असल्याने मी जळगाव येथे जाऊन तिची १५ दिवस सेवा केली. त्यानंतर ती वारली. नंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी वडिलांची काळजी घेण्यासाठी सांगितले, त्यामुळे मी घरीच थांबायचे ठरवले. नंतर मी ‘जॉब’ करू लागलो. वर्ष २०१८ मध्ये माझा विवाह झाला आणि वर्ष २०१९ मध्ये बाळ, म्हणजे चि. हृषिकेश जन्माला आला. विवाहासाठी मी सनातनची साधिका मिळण्यासाठी प्रयत्न केले. नंतर वैदेहीचे स्थळ आल्यावर तिला पाहून तिच्यात साधकत्व असल्याचे लक्षात आले. तिला विवाहाच्या आधी सनातन संस्थेची काहीही माहिती नव्हती. विवाहानंतर तिला माहिती झाली आणि तिने साधनेला आरंभ केला. वर्ष २०१८, १९ आणि २० या कालावधीत मी नोकरी करतांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले. सध्या मी दैनिक पी.डी.एफ्. व्हॉट्सअॅपने पाठवणे, गुरुपौर्णिमा अर्पण गोळा करणे इत्यादी सेवा करत आहे.
१. श्री. विशाल पवार (चि. हृषिकेशचे वडील) यांना बाळाच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. परात्पर गुरुदेवांच्या स्मरणाने आणि एकमेकांच्या अनुभूती सांगून वैवाहिक जीवनाला प्रारंभ होणे
‘विवाहानंतरच्या पहिल्या दिवशी आम्ही दोघे परात्पर गुरु डॉक्टरांच्या स्मरणातच रमलो होतो. या दिवशी आमचे बोलणे देव, गुरु आणि गुरूंची कृपा यांविषयी होते. या वेळी परात्पर गुरुदेवांच्या स्मरणाने माझी भावजागृती होत होती आणि घरात सतत त्यांचे अस्तित्व जाणवत होते. पत्नीला साधना किंवा सनातनशी संबंधित काहीच ठाऊक नसतांना तिचे पूर्वानुभव एखाद्या साधिकेप्रमाणेच होते.
पत्नीला पुढे घडणार्या, तसेच पूर्वी घडलेल्या घटनांची सूक्ष्मातून जाणीव होणे, तिनेे सांगितल्यानुसार विवाहानंतर सहा मासांतच ती गरोदर रहाणे आणि पहिला मुलगा होऊन त्याचा जन्म परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी होणे
विवाहानंतर दोन मासांनी पत्नीने मला सांगितले, ‘‘मला विवाहानंतर सहा मासांतच गर्भधारणा होईल. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला बाळ होईल आणि पहिला मुलगा असेल. तिने सांगितलेल्या या तिन्ही गोष्टी सत्य ठरल्या. पत्नीला विवाहानंतर तिसर्या मासातच दिवस राहिले आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या तिथीला आम्हाला मुलगा झाला. पत्नीला याविषयी कुणी सांगितले नव्हते; पण तिला आतूनच असे वाटले की, पुढे असे घडणार आहे. ‘माझ्याशी विवाह होणार’, हेही तिला विवाहापूर्वीच जाणवले होते. नंतर रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘आपण हे सगळे आधी पाहिले आहे’, असे तिला वाटले, म्हणजे ‘या सगळ्या गोष्टी पूर्वीच घडून गेल्या आहेत’, असे तिला जाणवले. ‘रामनाथी आश्रमातील ज्या खोलीत आम्ही रहात होतो, ती खोली, तसेच साधक हे सगळे आधी पाहिले आहे’, असे तिला वाटले होते. |
१ आ. घरात परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांच्या चरणी त्यांच्यासारखे बाळ होण्यासाठी प्रार्थना होणे
आमच्याकडून प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होऊन आमची भावजागृती होत असे. त्या वेळी घरात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून वातावरण हलके होत असे. माझ्याकडून परात्पर गुरुदेवांना ‘आपल्यासारखे चैतन्यदायी आणि सर्वांना सामावून घेणारे बाळ जन्माला येऊ दे’, अशी प्रार्थना होत असे.
१ इ. व्यष्टी साधना आणि देवाची उपासना यांत नियमितता येणे
जुलै २०१८ पासून आम्हा दोघांची व्यष्टी साधना सुरळीत होऊ लागली. दोघांकडूनही दत्तगुरूंची उपासना अधिक होत होती. सकाळ-संध्याकाळ दत्तगुरूंची आरती करणे, मंदिरात दर्शनाला जाणे, खोक्यांचे उपाय करणे, श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणे, वास्तूशुद्धी करणे आदी गोष्टी नियमित होऊ लागल्या.
१ ई. स्वप्नात एक लहान मुलगी आणि दैवी नाग दिसणे, ‘मुलीला नागांची भीती वाटेल’, असा विचार करून तिला बाजूच्या शिवमंदिरात नेणे अन् शिवपिंडीला नमस्कार करत असतांना तिच्या डोक्यावर अभिषेकाचे तीर्थ पडून तिचे रूपांतर लहान बाळात होणे
२७.८.२०१८ या दिवशी (श्रावण सोमवारी) पहाटे मला एक स्वप्न पडले, ‘एका तीर्थक्षेत्री नदीत अनेक दैवी नाग डोलत आहेत. हे सर्व नाग एका अडीच ते तीन वर्षांच्या मुलीला पहाण्यासाठी आले आहेत आणि ती मुलगीही त्या नागांना पहात आहे. ‘ती लहान मुलगी फणा काढून तिच्याकडे पहाणार्या नागांमुळे घाबरून जाईल’, असा विचार करून मी तिला पटकन उचलून माझ्या कडेवर घेतले आणि तिला बाजूला असलेल्या शिवमंदिरात घेऊन गेलो. तिची भीती दूर व्हावी; म्हणून मी तिचे कान फुंकले. नंतर मी त्या मुलीचे डोके शिवपिंडीवर टेकवू लागलो. त्या वेळी माझे पूर्ण लक्ष शिवपिंडीवर होते. मुलीचे डोके शिवपिंडीवर टेकवत असतांना शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे तीर्थ त्या मुलीच्या डोक्यावर पडून तिचे रूपांतर नवजात बाळात झाले.’
१ उ. स्वप्नात एक बाळ आकाशातून येऊन मणिपूरचक्राच्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे दिसणे आणि पुढचे दोन दिवस ही अनुभूती येणे
७.९.२०१८ या दिवशी मी झोपलो असतांना ‘आकाशातून सुपारीपेक्षाही लहान आकार असलेले एक बाळ आले आणि ते माझ्या नाभीभोवती नमस्काराच्या मुद्रेत प्रदक्षिणा घालत आहे’, असे मला जाणवले. नंतर पुढचे दोन दिवस मला ही अनुभूती येऊन ‘ते बाळ माझ्या मणिपूर चक्राभोवतीच आहे’, असे जाणवत होते. ही स्थिती आनंददायी होती. मी पत्नीला ही अनुभूती सांगितली आणि गमतीत म्हटले, ‘‘बाळ तुझ्याकडे येण्याआधी माझ्या पोटात येऊन राहिले आहे.’’ नंतर ९.९.२०१८ या दिवशी पत्नी गरोदर असल्याचे कळले.
(ही अनुभूती श्री गणेशाने पृथ्वी प्रदक्षिणा म्हणून ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ या भावाने शिवपार्वतीला घातलेल्या प्रदक्षिणेप्रमाणे होती. काही वर्षांपूर्वी ‘बाळ’ या विषयाचे ज्ञान मिळत असतांना मला जिवाचा उच्च लोकातून पृथ्वीकडे होणारा प्रवास अनुभवता आला होता; मात्र या अनुभूतीतून जिवाचे गर्भात होणारे आगमन अनुभवता आले.)
१ ऊ. गर्भावर संस्कार व्हावेत, यासाठी मी पत्नीला ‘बाळाशी बोलायला हवे’, असे सांगून त्याला साधना शिकवण्यास सांगितले.’
– श्री. विशाल पवार, जळगाव
२. गरोदरपण
२ अ. पहिले ३ मास
‘मला मध्यरात्रीनंतर सकाळपर्यंत झोप लागत नसे. (बाळाचा जन्म झाल्यानंतरही एक मास मी रात्री ३ ते ६ वाजेपर्यंत झोपले नाही.)
२ आ. पाचवा मास
२ आ १. यजमानांनी साधिकेच्या पोटावर हात ठेवून श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना उभयतांना होणारे त्रास : माझे यजमान माझ्या पोटावर हात ठेवून नियमितपणे श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत. त्या वेळी माझ्या पोटातून ‘पुष्कळ मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर पडत आहे’, असेे मला जाणवायचे. त्या वेळी त्यांच्या हाताला चटके बसून हात दूर केला जात असे. या काळात माझे शरीर सतत उष्ण रहात असे. यजमानांनी मला स्पर्श केला, तरी त्यांच्या हाताला वेदना होत.
(बाळ आईच्या पोटात असतांना बाळामुळे आईच्या देहात चांगली स्पंदने असायची. बाळाच्या वडिलांना अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असल्याने बाळाच्या आईला स्पर्श झाला, तरी वडिलांना त्रास व्हायचा. असे होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. यावरून ‘बाळ किती सात्त्विक आहे’, ती कल्पना येते. – संकलक)
२ आ २. या मासात मला ‘सतत श्रीरामरक्षास्तोत्र ऐकू येणे, तसेच कुलदेवीचा नामजप चालू असणे’, अशा अनुभूती येत होत्या.’
– सौ. वैदेही विशाल पवार (चि. हृषिकेशची आई), जळगाव
२ आ ३. पोटातील बाळाला ‘कोणत्या तिथीला जन्म घेण्यास आवडेल ?’, हे विचारले असता त्याने ‘अक्षय्य तृतीया’ आणि ‘परात्पर गुरुदेवांचा जन्मदिवस’ या तिथींना पाय हलवून सकारात्मक प्रतिसाद देणे : ‘एक दिवस मी पत्नीला ‘बाळाला कोणत्या तिथीला जन्म घ्यायला आवडेल ?’, हे विचारण्यास सांगितले. तिने पोटावर हात ठेवून बाळाला जन्म घेण्यास योग्य अशा श्रीरामनवमी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा दिवस या ४ तिथी सांगितल्या. यातील ‘अक्षय्य तृतीया’ आणि ‘परात्पर गुरुदेवांचा जन्मदिवस’ या तिथींना बाळाने पाय हलवून सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘बाळाने दिलेला प्रतिसाद योग्य आहे का ?’, हे पडताळण्यासाठी पत्नीने मला पुन्हा विचारण्यास सांगितले. तेव्हा मी बाळाशी बोलल्यावर बाळाने पुन्हा आधीसारखाच प्रतिसाद दिला.
२ इ. ६ मासानंतर आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढून सात्त्विक कृती करण्याची ओढ न्यून होणे : पहिले ६ मास घरातील वातावरण पुष्कळ चैतन्यदायी असल्याचे जाणवत होतेे. सकाळ झाल्यावर देवपूजा, नामजप, स्तोत्र म्हणणे, वास्तूशुद्धी करणे आदी सगळ्या गोष्टींची ओढ लागत होती. ‘बाळाला या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आणि सांगायच्या आहेत’, असे वाटून प्रतिदिन हे प्रयत्न होत होते.
पत्नीला सातवा मास लागल्यापासून ही ओढ न्यून होत गेली आणि मला होणार्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढले.
२ ई. सातवा मास
स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसून त्यांनी बाळाला हातात घेतल्याचे दिसणे : २६.२.२०१९ या दिवशी माझ्या स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आल्या. त्यांनी आमच्या बाळाला हातात घेतले आणि म्हणाल्या, ‘हातात घेतल्यावरच बाळ ध्यान लावत आहे. बाळ पुष्कळ सात्त्विक आहे.’ त्यांनी बाळाला हातात घेण्यापूर्वी ते जागे होते. त्यांनी हातात घेतल्यावर बाळाने लगेच डोळे मिटले आणि ध्यान लावल्याप्रमाणे त्याचे डोळे स्थिर झाले.’
बाळाच्या जन्मानंतर ‘ते स्वप्नात दिसलेल्या बाळाप्रमाणेच आहे’, असे माझ्या लक्षात आले.
३. बाळामध्ये दैवी गुण यावेत, यासाठी पत्नीने ९ मास केलेल्या प्रार्थना !
अ. ‘हे नारायणा, तू संस्कारांचा निर्माता आहेस. विश्वातील प्रत्येक जीव तुझेच प्रतिबिंब आहे. हे भगवंता, तूच तुझ्यातील सर्व गुण माझ्या गर्भातील जिवाला प्रदान कर.
आ. हे बाळा, तू सत्यवादी हरिश्चंद्रासारखा सत्याच्या मार्गावर चालणारा पुत्र हो.
इ. हे बाळा, स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तू क्षत्रिय पुत्र हो.’
– श्री. विशाल पवार
४. समाजातील अनेक लोकांनी ‘मुलगा होणार’, असे स्वतःहून सांगणे
अ. ‘माझ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला आलेल्या एका परिचित महिलेने ‘तुला होणारे बाळ साधना करून संत होणार आहे’, असे सांगितले. याचे आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण ती महिला साधना करत नाही आणि साधनेविषयी तिला काही ठाऊकही नाही.
आ. मी बाळंतपणासाठी माहेरी गेले असतांना आमच्या घरी एक संन्यासी आले होते. मला पहाताक्षणी त्यांनी ‘तुला मुलगा होणार आहे’, असे सांगितले. नंतर ३ दिवसांनी मला मुलगा झाला.
(माझा विवाह ठरण्याच्या काही दिवस आधी हे संन्यासी आमच्या घरी आले होते. त्यांनी मला ८ दिवस मुंग्यांना साखर टाकण्यास सांगून ‘त्यानंतर तुझा विवाह ठरेल’, असे सांगितले होते. त्याप्रमाणे केले असता आमचा विवाह ठरला होता.’)
– सौ. वैदेही विशाल पवार, जळगाव (एप्रिल २०२०)
५. बाळाचा जन्म
‘१०.५.२०१९ या दिवशी (वैशाख शुक्ल पक्ष सप्तमीला) बाळाचा जन्म झाला.
५ अ. नवजात (नुकत्याच जन्मलेल्या) बाळाची सहनशक्ती
जन्मानंतर ७ दिवसांनीही बाळ आईच्या अंगावरचे दूध पीत नव्हते. त्यामुळे त्याला रुग्णालयात ठेवावे लागले. ११ दिवसांच्या या कालावधीत वेगवेगळे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी बाळाला ‘सलाईन’ लावतांना, तपासणीसाठी रक्त काढतांना, तसेच रक्त चढवतांना अनेकदा सुया टोचल्या; पण बाळ रडले नाही.’
– श्री. विशाल पवार (बाळाचे वडील), जळगाव
५ आ. वय – जन्म ते २ मास
१. ‘बाळाला रुग्णालयातून घरी आणल्यावर त्याच्या कपाळावर नाम लावल्याप्रमाणे खूण दिसली. ही खूण दीड मासापर्यंत होती.
२. श्री दत्तगुरूंची आरती ऐकल्यावर बाळ हाताची तर्जनी, मध्यमा आणि अंगठा यांची टोके जोडून मुद्रा करत असे. तो झोपलेला असतांना नामजप किंवा भजन लावल्यास तो गालातल्या गालात हसत असे आणि दोन्ही हातांच्या बोटांची मुद्रा करत असे. काही वेळा त्याचा तोंडवळा भाव जागृत झाल्याप्रमाणे दिसायचा. त्या वेळी त्याच्या तोंडवळ्यावरील तेज वाढत असे. (असे आताही होते.)
३. बाळ १ मासाचे असतांना माझ्या माहेरची एक व्यक्ती रागाच्या भरात घर सोडून गेली होती. त्याविषयी माझे भ्रमणभाषवर बोलणे चालू होते. बाळ ते बोलणे ऐकत होते. त्यानंतर त्याने त्याच्या दोन्ही हातांची बोटे जोरजोरात हालवायला आरंभ केला. माझे भ्रमणभाषवर बोलणे चालू असेपर्यंत त्याची ही कृती चालू होती.’
– सौ. वैदेही विशाल पवार (बाळाची आई)
(‘बाळाची ही कृती पाहून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वी माझ्यासाठी नामजपादी उपाय करतांना अशी मुद्रा केली होती’, याचे मला स्मरण झाले. त्यानंतर दोन घंट्यांनी ती व्यक्ती सापडल्याचा आम्हाला निरोप मिळाला.’ – श्री. विशाल पवार)
५ इ. तिसरा मास
१. ‘चि. हृषिकेशला सनातनचे बालसंत पू. भार्गवराम यांचा ग्रंथ दाखवल्यावर त्याने त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला.
२. हृषिकेश झोपतो, त्या ठिकाणी भिंतीवर सनातन पंचांग लावलेले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये तो पंचांगावरील सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्या वेळी ‘तो लडिवाळ भावाने देवाला ‘स्वतःला होणारा त्रास सांगत आहे’, असे त्याच्या तोंडवळ्यावरचे भाव होते. श्रीकृष्णाशी बराच वेळ बोलून झाल्यावर तो शांत झोपी गेला.’
– श्री. विशाल पवार
(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
|