स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुणवत्तापूर्ण पथसंचलन ! 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने निघालेले पथसंचलन

कोल्हापूर, १३ जानेवारी (वार्ता.) – स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तर कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने गुणवत्तापूर्ण पथसंचलन झाले. प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथून प्रारंभ झालेले संचलन शहरातील विविध मार्गांवर जाऊन त्याचा प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे समारोप झाला. संचलनाच्या मार्गावर नागरिक, हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध संस्था यांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. अत्यंत शिस्तबद्ध, एका लयीत आणि देशप्रेम उत्पन्न करणार्‍या संचलनाने कोल्हापूरकरांची मने जिंकली. संचलन संपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुहासराव हिरेमठ यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी आणि समाज परिवर्तनाची वाटचाल’ यावर व्याख्यान झाले.

हिंदु धर्म, हिंदु विचार, हिंदु संस्कृतीची प्रभावी मांडणी स्वामी विवेकानंद यांनी जगभरात केली. त्यांची जयंती १२ जानेवारी या दिवशी जगभरात ‘युवकदिन’ म्हणून साजरी केली जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने निघालेले पथसंचलन

स्वामी विवेकानंद यांनी जसे प्रत्येक गावात क्षमतावान युवक निर्माण व्हावेत, असे स्वप्न पाहिले होते, तसे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघही करत आहे. संघाच्या शताब्दी वर्षात स्वामीजी आणि संघाचे हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संघाचे स्वयंसेवक नियमितपणे समाजात जाऊन समाजासमवेत आणि समाजासाठी काही ना काही कामे करत असतात. हळूहळू संपूर्ण समाजाला सुसंघटित करण्याचे प्रयत्न करत असतात. मुळातच देशभक्त असलेल्या हिंदु समाजाला लागलेल्या काही सवयी पालटण्यासाठी स्वयंसेवकांनी कुटुंब प्रबोधन, स्वदेशी, नागरी शिष्टाचार, स्वबोध, पर्यावरण या विषयांत काम चालू केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक गावात क्षमतावान स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील ! – सुहासराव हिरेमठ

कोल्हापूर – स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक गावात क्षमतावान युवक निर्माण व्हावेत, असे स्वप्न पाहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही प्रत्येक गावात असे क्षमतावान स्वयंसेवक निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्नरत आहे. आपला समाज हा एका कुटुंबासारखा असून देवस्थाने-मंदिरे, सार्वजनिक पाणवठे आणि स्मशानभूमी या सर्वांवर प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. एखाद्या देशाचा योग्य प्रकारे विकास तेव्हाच शक्य होऊ शकतो, जेव्हा तेथील नागरिकांमध्ये नागरी कर्तव्यांची जाणीव असते आणि ते ती कर्तव्ये पाळण्याच्या संदर्भात कुचराई करत नाहीत. हीच स्वप्ने प्रत्येक नागरिकाच्या मनात पुन्हा एकदा जागृत व्हावीत, असे संबोधन अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुहासराव हिरेमठ यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी पंचपरिवर्तन आणि अन्य ३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा संघचालक डॉक्टर सूर्यकिरण वाघ, शहर संघचालक श्री. प्रमोद ढोले यांसह अन्य उपस्थित होते.