गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि ‘अन्याय रहित जिंदगी’ यांच्या अहवालातून स्पष्ट
पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – व्यापारी तत्त्वावर लैंगिक व्यापार करणार्या महिला आणि मुली मोठ्या संख्येने गोव्यात रहात आहेत. हा लैंगिक व्यापार आता पर्यटनाखाली नसलेल्या भागातही पसरला असून बार्देश तालुक्यात या महिला आणि मुली यांचे प्रमाण अधिक आहे. या तुलनेत लैंगिक तस्करी करण्यार्यांविरुद्ध पोलिसांनी नोंद केलेले गुन्हे आणि लैंगिक व्यापाराच्या विरोधात पुढाकार घेण्याचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे. गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या अहवालानुसार गोव्यात सध्या ६ सहस्र ४२५ लैंगिक व्यापार करणार्या महिला आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिला संपूर्ण गोवाभर परसलेल्या आहेत.
‘अन्याय रहित जिंदगी’ या अशासकीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा बायणा भाग लैंगिक व्यापार करण्याकरता बंद करण्यात आला, त्या वेळी ९०० ते १ सहस्र २०० लैंगिक व्यापार करणार्या महिला होत्या. आज राज्यात सर्वत्र यांचे प्रमाण वाढले आहे. या संस्थेचे अरुण पांडे म्हणाले, ‘‘आतापर्यंत लक्षात आलेली आकडेवारी पुरेशी आहे. कदाचित् ती त्याहून अधिक असू शकते. पूर्वी मुरगाव भागात एड्स रोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात होते; परंतु आता बार्देश हा केंद्रबिंदू बनत आहे. गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या अहवालावरून हे स्पष्ट होत आहे. या लैंगिक
व्यापाराचा स्थानिकांवर परिणाम होत आहे. गोव्यातील रहिवाशांविषयी काळजी वाटत आहे. या संदर्भात ग्राहक हा प्रथम गुन्हा करणारा आहे आणि त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या मागणीवर आपण उपाययोजना केली नाही, तर आपण लैंगिक तस्करी थांबवू शकणार नाही. या व्यापाराला चालना देणारे दलाल आणि ऑनलाईन संकेतस्थळे यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. मानवी तस्करीविरुद्ध कारवाई करतांना ती दिशाहीन नसावी. जर मूळ कारण शोधून न काढता केवळ या व्यवसायातील मुलींची सुटका केली, तर गरिबीमुळे आणखी अधिक मुली या व्यवसायात येतील.
‘अन्याय रहित जिंदगी संस्थे’च्या अहवालानुसार लैंगिक व्यापार करणार्यांपैकी ३२.६९ टक्के महिला आर्थिक समस्येमुळे या व्यवसायात आहेत, तर ३६.५४ टक्के महिलांनी त्यांच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी हा व्यवसाय स्वीकारला आहे. गोवा हे लैंगिक व्यापाराचे केंद्र नाही, याचा प्रचार करणे आवश्यक आहे. यासाठी सक्रीय उपाययोजना, याविरुद्ध कारवाई, जागृती आणि धोरणात पालट करणे आवश्यक आहे. ‘अन्याय रहित जिंदगी संस्थे’च्या अहवालानुसार गोव्यातील डिचोली, सत्तरी, फोंडा, मुरगाव या विशेष पर्यटन नसलेल्या भागांतही लैंगिक व्यापारात गुंतलेल्या महिला आणि मुली मोठ्या प्रमाणात आहेत. या भागांत गोव्यातील, तसेच गोव्याबाहेरून येऊन गोव्यात स्थायिक झालेले युवक या व्यापाराला बळी पडत आहेत.’’
गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या अहवालानुसार तिसवाडी तालुक्यात ८०१, डिचोली तालुक्यात ६६७, मुरगाव तालुक्यात ८६५, सालसेत तालुक्यात ७६१ आणि सत्तरी तालुक्यात ८११ अशी लैंगिक व्यापार करणार्यांची आकडेवारी आहे.
राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिनानिमित्त पणजी येथे फेरीचे आयोजन
पणजी – ‘स्टॉप चाईल्ड अब्युझ नाऊ’ (आता मुलांचे लैंगिक शोषण थांबवा) गोवा पोलिसांचे महिला पोलीस ठाणे आणि ॲन्टी ह्युमन टॅ्रफिकिंग युनिट (मानवी तस्करी विरोधी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जानेवारी या दिवशी ‘राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिनानिमित्त एका फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीमध्ये गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालय, पार्वतीबाई चौगुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि व्ही.एम्. साळगांवकर कायदा महाविद्यालय या महाविद्यालयांतील विद्यार्थी, पोलीस, ‘सेक्शुअल चाईल्ड अब्युझ नाऊ संघटने’चे कर्मचारी, असे मिळून एकूण २०० जण या फेरीत सहभागी झाले होते.