पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत मंदिर विश्वस्तांचा संघटित होण्याचा निर्धार !

बैठकीला उपस्थित मंदिर विश्वस्त

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), १३ जानेवारी (वार्ता.) – शहरातील संभाजीनगर येथील श्री दत्त मंदिर येथे ११ जानेवारीला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आयोजित मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. अनुमाने १८ मंदिरांच्या ३० विश्वस्तांनी या बैठकीत सहभाग घेतला. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या बैठकीत मंदिर व्यवस्थापनासंबंधी काही ठराव मांडण्यात आले. यात प्रामुख्याने प्रत्येक मंदिरात साप्ताहिक सामूहिक आरती म्हणणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, महाराष्ट्रातील सर्व मंदिरांनी एकमेकांसमतेव समन्वय राखत चुकीच्या घटनांना एकत्रित विरोध करणे, मंदिर विश्वस्तांची नियमित बैठक घेणे हे ठराव उपस्थित विश्वस्तांकडून उत्स्फूर्तपणे अनुमोदित करण्यात आले.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र मंदिर महासंघ पुणे जिल्ह्याचे संयोजक ह.भ.प. चोरगे महाराज यांनी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ला मंदिरे जोडल्यामुळे मंदिरांच्या वेगाने होणार्‍या विकासाविषयी माहिती दिली, तसेच प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती चालू करून भाविकांना मंदिरांशी जोडून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सांप्रतकाळात हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे ? हे स्पष्ट करतांना श्री. पराग गोखले यांनी ‘प्रत्येक मंदिर हे धर्मशिक्षणाचे केंद्र बनावे’, असा मनोदय व्यक्त केला. त्यांनी मंदिर सरकारीकरणामुळे धर्मावर होणार्‍या आघातांविषयी आणि आर्थिक अपव्ययांविषयी माहिती दिली.