प्रारंभीपासूनच आश्रमात जाऊन सेवा करण्याची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी आश्रमातील सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. डोंबिवली येथील जाहीर सभेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याभोवती प्रकाशाचे वलय दिसणे, त्या वेळी ‘आश्रमात सेवा करायला मिळण्यासाठी त्यांना प्रार्थना करणे आणि त्यानंतर तीन मासांत देवद आश्रमात सेवेला जाणे

कु. प्रतीक्षा हडकर

‘वर्ष २००२ मध्ये मी साधनेला आरंभ केला. मी ३ मास प्रसारात सेवा केली. त्यानंतर दुसर्‍या मासातच डोंबिवली येथे प.पू. डॉ. आठवले यांची शेवटची जाहीर सभा होती. सभेला प.पू. डॉ. आठवले, प.पू. जोशीबाबा आणि इतर संत येणार आहेत, हे ऐकल्यावर मला पुष्कळ भरून आले‌. सभेसाठी गेल्यावर ‘आता मला प.पू. डॉक्टरांना पहायला मिळणार. मला त्यांचे दर्शन होणार’, या विचाराने मला पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर काही वेळातच उद्घोषणा झाली की, ‘प.पू. डॉक्टर यांचे सभास्थळी आगमन होत आहे.’ मी प्रार्थना केली आणि मागे वळून पाहिले, तर मला प.पू. डॉक्टरांभोवती प्रकाशरूपी वलय दिसले. मला प.पू. डॉक्टर पुष्कळ उंच दिसले. माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली, ‘मला आश्रमात सेवा करायला यायचे आहे. तुम्हीच मला आश्रमात घेऊन जा.’ त्यानंतर तिसर्‍या मासांत मला आणि माझ्या दोन बिहणींना सेवेसाठी १ मास देवद आश्रमात जाण्याची संधी मिळाली. देवच येऊन मला आश्रमात आपल्याजवळ घेऊन गेला. तेथे मला आईची कधीच आठवण आली नाही. देवाने मला तिची उणीव भासू दिली नाही.

२. आईच्या समवेत गोव्याला प.पू. डॉ. आठवले यांच्या खोलीत त्यांना भेटायला जाणे आणि प.पू. डॉ. आठवले यांना पहाताच आईला पुष्कळ भरून येणे अन् तिने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करणे

एकदा मी, माझी आई आणि बहीण गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात ८ दिवस रहायला गेलो होतो. बहीण ५ – ६ दिवसांनी घरी गेली. त्या संध्याकाळी आमची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. त्यांची खोली फारच लहान होती. मी आणि आई त्यांच्या खोलीत गेलो. आईने त्यांना पूर्वी कधी पाहिले नव्हते. आई नमस्काराची मुद्रा करून उभी होती. त्यांनी अगोदरच मला देण्यासाठी चॉकलेट्स काढून ठेवली होती. मी खोलीत गेल्यावर त्यांनी ती मला दिली. त्यांनी आमच्या घरातील सर्वांची विचारपूस केली. आईला बोलायला सांगितले. त्या वेळी आईची भावजागृती झाली; परंतु प.पू. डॉक्टरांनीच त्यांचे दोन्ही चरण पुढे केले. त्याचक्षणी आईने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि ती उठली. (‘आईला त्यांना नमस्कार करायचा होता’, हा तिच्या मनातील विचार त्यांच्यापर्यंत पोचला.) नंतर मीसुद्धा त्यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला.

३. साधिकेमधील अबोलपणा दूर करण्यासाठी आश्रमात स्वागतकक्षातील सेवा आणि सत्संगात सूत्रसंचालनाची सेवा देणे

माझा स्वभाव अबोल आहे; म्हणून प.पू. डॉक्टरांनी मला स्वागतकक्षात सेवा करण्यास सांगितली. मी कधी २ – ३ दूरभाष एका वेळी हाताळले नव्हते. ते मला हाताळता येऊ लागले. अन्य सेवाही माझ्याकडून सहज होऊ लागल्या आणि माझे बोलणेही वाढले. मला माझ्यात झालेले पालट पाहून आश्चर्य वाटत होते. तेव्हा सेंवाकेंद्रात सत्संग असायचे. त्यात मला सूत्रसंचालन करण्याची सेवा दिली गेली.

४. साधिकेला सत्संगात ध्वनीक्षेपकावर बोलण्याचे धाडस नसणे, तिने बोलण्यास आरंभ करण्यापूर्वी प.पू. डॉक्टरांना ‘तुम्हीच माझ्या माध्यमातून बोला’, अशी प्रार्थना करणे आणि त्यानंतर तिला सहजपणे बोलता येणे

त्या सत्संगात ध्वनीक्षेपकावर (माईकवर) बोलायचे होते. तेव्हा माझे हात-पाय थरथरत असत. ‘मला बोलायला जमणार नाही’, असे मला वाटायचे. तेव्हा ‘प.पू. डॉक्टरांनी (देवाने) मला ही सेवा दिली आहे. तेव्हा देवच माझ्या माध्यमातून बोलणार आहे’, असा मी विचार करायचे. नंतर मी सत्संगात ध्वनीक्षेपकावर बोलायला आरंभ करण्यापूर्वी ५ मिनिटे  मनातल्या मनात ‘प.पू. डॉक्टर, तुम्हीच माझ्या माध्यमातून ध्वनीक्षेपकावर बोला’, अशी प्रार्थना करायचे. त्यानंतर मला सहज बोलता यायचे. ‘सत्संग केव्हा संपला’, हेही मला कळायचे नाही. अशा प्रकारे प.पू. डॉक्टरांनी माझ्यातील अबोलपणा दूर केला.’

– सुश्री (कु.)  प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक