
सातारा, १३ जानेवारी (वार्ता.) – १० वी-१२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणी परिसरात ३ दिवसांचा भव्य राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव घेण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाने सुयोग्य जागा निवडावी, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आदर्श शाळेचा नमुना (‘पॅटर्न’) राबवणारा सातारा जिल्हा राज्यासाठी आदर्श ठरला आहे. सातारा जिल्ह्याचे दोन्ही उपक्रम राज्यात सर्वत्र राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांमध्ये अनेक शाळा आणि आरोग्य केंद्रांची कामे येत्या २ मासांत पूर्ण होतील. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून अनुमाने १५३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावरील काम रखडल्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी वेगळा प्रस्ताव सिद्ध करून तो शासनाकडे पाठवण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी पुनर्वसनाची कामे मार्गी लावावीत, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संमत झालेली सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी.