
रायगड – रायगडावर चालू असलेल्या विकासकामांना गती मिळण्यासाठी आणि कच्चा माल गडावर नेण्यासाठी ‘एअर लिफ्टिंग’चा वापर करावा, अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘रायगड विकास प्राधिकरणा’च्या अधिकार्यांना केली. रायगड विकास प्राधिकरणाची आढावा बैठक घेऊन रायगडावर चालू असलेल्या विकास, संवर्धन आणि संरक्षण या कामांची दानवे यांनी पहाणी केली. रायगड मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. किल्ले रायगडाशी हिंदवी स्वराज्याशी संबंधित जाज्वल्य इतिहास जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाला अनुसरून गडावर सुनियोजित विकासात्मक कामे करा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या. विकासकामे जलदगतीने होण्यासाठी नौदलाशी बोलून कच्चा माल गडावर ‘एअर लिफ्टिंग’ करण्याची आवश्यकता असून याविषयी मुख्यमंत्र्यांना सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रायगड विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असलेली कामे आणि अन्य ठिकाणांची पहाणी या वेळी दानवे यांनी केली.