धनंजय देशमुख यांचे आंदोलन
मस्साजोग (बीड) – सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा नोंद करावा, तसेच मकोका अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी १३ जानेवारीला मस्साजोग गावातील टाकीवर चढून आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या विनंतीनंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलतांना धनंजय देशमुख म्हणाले, ‘‘आम्हाला राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, तसेच विशेष पोलीस पथकाकडून अन्वेषणाविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. वाल्मिक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा नोंद का ? त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद का होत नाही ? या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पसार आहे. त्याला कधी अटक होणार ? या संदर्भात आम्ही सरकारला १४ जानेवारीपर्यंत समयमर्यादा दिली आहे; अन्यथा आम्ही पुढील निर्णय घेऊ.’’
या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना बीडचे पोलीस अधीक्षक नवीत काँवत म्हणाले, ‘‘या प्रकरणाचे अन्वेषण सध्या राज्य गुन्हा अन्वेषण शाखेकडे असल्याने या संदर्भात मी उत्तर देऊ शकत नाही. देशमुख कुटुंबियांची मागणी आम्ही विशेष पोलीस पथकाकडे पोचवली असून त्यांचे वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून ते कुटुंबियांची भेट घेतील. गावकरी आणि कुटुंबाला आमची विनंती आहे की, अशा पद्धतीचे आंदोलन करू नका. आपल्या न्यायासाठी सर्व अन्वेषण यंत्रणा प्रयत्न करत आहेत.’’