संतप्त नातेवाइकांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले !
जळगाव – येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नातेवाइकांचा वावर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने ‘रुग्णांच्या नातेवाइकांना पीपीई किटविना रुग्णालयाच्या आत सोडू नये’, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला आहे. या आदेशाची कार्यवाही १६ मेच्या सकाळपासून चालू झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. ‘या निर्णयामुळे आर्थिक भुर्दंड बसणार असून तो तात्काळ मागे घ्यावा’, अशी मागणी करत नातेवाइकांनी रुग्णालयासमोरील रस्त्यावर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. (जिल्हाधिकार्यांनी असा आदेश देण्यापूर्वी पीपीई किटचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी होती. तसेच प्रशासनाकडून स्वस्त दराने ‘पीपीई किट’ची विक्री करायला हवी होती ! – संपादक)
सकाळी रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला न्याहारी आणि जेवण यांचा डबा देण्यासाठी आले होते, त्या वेळी त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले. ‘तुम्हाला पीपीई किटविना आत जाता येणार नाही’, असे सांगत त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर काही रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालय परिसरातील औषधाच्या दुकानांतून ‘पीपीई किट’ खरेदी चालू केली. अर्ध्या घंट्यांनंतर ‘पीपीई किट’ची मागणी वाढताच औषध दुकानदार २५० रुपयांचे ‘पीपीई किट’ दुप्पट किमतीत विक्री करू लागले. (असे घडल्यावर प्रशासनाने औषध दुकानदारांवर कठोर कारवाई का केली नाही ? कोरोना संकटाच्या काळात एकमेकांना साहाय्य करण्याऐवजी ‘पीपीई किट’चे दर वाढवून औषध दुकानदार ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा’ प्रकार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी ! – संपादक)
नातेवाइकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. अनेक नातेवाइकांकडे ‘पीपीई किट’साठी पैसे नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला. यामुळे रुग्णालयाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन मागे घेतले. या घटनेची माहिती जिल्हाधिकार्यांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयाकडून नातेवाइकांना ५० ‘पीपीई किट’ देण्याच्या सूचना अधिष्ठातांना केल्या. त्यानंतर ५-५ जणांना ‘पीपीई किट’ घालून जेवणाचा डबा आणि पाणी देण्यासाठी आत सोडण्यात आले.