सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडांची पडझड
ओरोस – वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी जनरेटर व्हॅन कार्यरत ठेवण्यात आली होती. या जनरेटरमधून ‘कोविड केअर सेंटर’मधील व्हेंटिलेटरना वीजपुरवठा केला जात आहे. या व्हॅनच्या जवळच वादळामुळे मोठे झाड पडले; मात्र सुदैवाने ते व्हॅनवर न पडल्याने अनर्थ टळला. तसेच या व्हॅनमध्ये दोघे जण कार्यरत होते. तेही वाचले.
वैभववाडी – वैभववाडी तालुक्यात एकूण २७ घरे आणि गोठे यांची हानी झाली आहे. तिथवली येथील गिरीश माईणकर यांची केळ्यांची बाग जमीनदोस्त झाली. मांगवली, लोरे, सडुरे, कुर्ली आदी ठिकाणी मोठी हानी झाली आहे.
मालवण – तालुक्यातील आचरा जामडूलवाडी, गाऊडवाडी भागात समुद्रातील उधाणाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. दुपारी १२ वाजता पाण्याची पातळी वाढण्यास प्रारंभ झाला आणि काही क्षणातच हा परिसर जलमय झाला. आचरा पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय येथेही पाणी शिरले होते. देवबाग, दांडी, आडारी, चौके, चिवलाबिच, धुरीवाडा येथे पडझडीच्या घटना घडल्या. वादळी वार्यामुळे या परिसरातील आंबा आणि नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडली.
कणकवली – कणकवली तालुक्याला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. समुद्रकिनार्यापासून ७० ते ८० कि.मी. दूर असलेल्या फोंडाघाट गावाला फटका बसला. येथील वीजपुरवठा यंत्रणा पूर्णत: कोलमडली असून २० वीजवाहिन्यांचे खांब कोसळले आहेत. वाघेरी वीजउपकेंद्रावर झाड पडल्याने उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता.
वेंगुर्ला – तालुक्यालाही चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी वार्याने घरांची कौले उडून गेली. घरे, दुकाने यांमध्ये पाणी शिरले. वेंगुर्ला बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा बसत होता. आडेली, नवाबाग, मातोंड आदी भागांत मोठी हानी झाली. झाडे पडल्याने होडावडा-मातोंड मार्ग बंद झाला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांचे खांब पडल्याने वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित होता.
सावंतवाडी – तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे येथील नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहाच्या छताचा (सिलिंगचा) काही भाग कोसळला आहे. सभागृहाचे काम चालू असल्याने त्यावरील पत्रे काढण्यात आले होते; मात्र अचानक पाऊस झाल्यामुळे त्याखाली असलेले सिलिंग कोसळले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे या घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. सावंतवाडी-शिरोडा मार्गावर सर्वोदय नगर येथे रस्त्यावर मोठे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.