हातखर्चातून साठवलेल्या पैशातून ५ महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुरवतात कोरोनाग्रस्तांना विनामूल्य न्याहरी !

हातखर्चातून साठवलेल्या पैशातून कोरोनाग्रस्तांना विनामूल्य न्याहरी पुरवणार्‍या ५ महाविद्यालयीन युवतींचे अभिनंदन ! अशा सात्त्विक व्यक्तीच देशाची शक्ती आहेत. यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर – येथील श्रुती प्रमोद चौगुले, अर्पिता दत्तात्रय राऊत, श्रेया प्रमोद चौगुले, आचल विनोद कट्यारे आणि नेहा निवास पाटील या विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी त्यांच्यापैकी दोघी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी कोरोना रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांची होणारी धावपळ आणि पोटाचे हाल पाहिले. याविषयी अन्य तिघींशी चर्चा करून रुग्णांसह कुटुंबियांना न्याहारी देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या हातखर्चातून साठवलेल्या पैशातून त्यांनी १० मे या दिवशी सकाळी न्याहरी बनवून विनामूल्य देण्यास चालू केले. कोरोना संसर्गामुळे त्यांच्या पालकांनी नकार देऊनही या सर्व तरुणींनी आपला निर्णय पालटला नाही. कोरोना काळात नाती दुरावली जात असतांना आपल्या विचारांना कृतीत आणून समाजासमोर आदर्श ठेवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.