‘म्युकरमायकोसिस’ आजारावर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचार !

नवी मुंबई – म्युकरमायकोसिस आजाराचे काही रुग्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळले असून त्यांची महापालिकेच्या वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांत पडताळणी करण्यात येत आहे. या रुग्णांवर महापालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर मधुमेह, कर्करोग असे आजार असणार्‍या, तसेच अवयव प्रत्यारोपण झालेल्या, तसेच कोरोनाच्या उपचारादरम्यान ‘स्टिरॉईड’ औषधे दिलेल्या काही रुग्णांमध्ये बरे होऊन घरी गेल्यानंतर १० दिवस ते ६ आठवडे या कालावधीत ‘ब्लॅक फंगल’ बुरशीच्या वाढीमुळे ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

या उपचारांमध्ये आवश्यक असलेली औषधे महाग असून त्याची मात्राही मोठ्या प्रमाणावर लागत आहे. त्यामुळे या रुग्णांच्या उपचाराचा सर्व व्यय महापालिका करणार आहे.