मृतदेह आणि माणुसकी !

उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गंगानदीमध्ये २-३ दिवसांत अनेक मृतदेह सापडत आहेत. बक्सर (बिहार) येथे ४० मृतदेह वाहून आले आहेत. यापूर्वी उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील नदीच्या किनारी अशाच प्रकारे मृतदेह वाहून आले होते. पूर्वी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांतही गंगानदी किनारी मृतदेह सापडले होते. यामुळे गंगानदीच्या किनार्‍यावर वास्तव्य करणार्‍या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘गंगानदीत मृतदेह सोडल्यास संबंधित मृताला मोक्ष मिळतो’, असाही एक समज येथे असल्यामुळे काही ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना गंगानदीत सोडले जाते; मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या जे मृतदेह गंगानदीत आढळत आहेत, त्याला हे कारण लागू होत नाही. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात रुग्णवाहिकेतून काही लोक मृतदेह नदीच्या किनारी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. यावरून प्रशासनातील एक घटकच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा ‘त्रास’ टाळण्यासाठी हा मार्ग अवलंबत असल्याचे म्हणण्यास वाव आहे. ‘नदीच्या किनारी वाहून आलेले मृतदेह हे कोरोनाबाधित रुग्णांचे आहेत’, असा कयास बांधला जात आहे आणि बर्‍याच अंशी तो खराही आहे. बक्सर येथील निवासी नरेंद्रकुमार मौर्य यांनी सांगितले की, घाटावर १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात; मात्र लाकडे उपलब्ध नसल्यामुळे लोक हे मृतदेह पाण्यात सोडतात आणि ते रोखण्यासाठी प्रशासन काहीही करत नाही. एक तर कोरोनाबाधिताचा मृतदेह पाण्यात सोडून ते दूषित करणे हे महापाप आहे. असे करणार्‍यांना शिक्षा हवीच; मात्र अशा मृतदेहांमुळे समाजाला काही अपाय होऊ नये, यासाठी दक्ष राहून त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था उपलब्ध करून देणे, मृतांच्या कुटुंबियांमध्येही जागृती करून ‘सर्व काळजी घेऊन अंत्यसंस्कार कसे करायचे? याविषयी प्रबोधन करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे; मात्र ते पार पाडण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

हिंदु संस्कृतीत १६ संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर केलेल्या संस्कारांना अंतिमसंस्कार म्हणतात. व्यक्तीला पुढील गती मिळण्यासाठी हे संस्कार सुयोग्य प्रकारे होणे आवश्यक असते. कोरोनाकाळात या विधींना फाटा दिला जात आहे. व्यवस्थेतील एका संवेदनशून्य, निष्काळजी आणि दायित्वशून्य घटकामुळे मृतदेहांची अशा प्रकारे हेळसांड होणे, हे संतापजनक आहे. प्रशासनाच्या दायित्वशून्य वर्तनामुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मनस्ताप होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रशासन लाकडेही का उपलब्ध करून देत नाही ? अशा दायित्वशून्य वर्तनामुळे जनतेला मनस्ताप भोगायला लावणारी यंत्रणा जनतेचे कधीतरी भले करू शकेल का ?

व्यवस्था अपयशी !

महामारी, युद्धे किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यात बळी जाणार्‍यांची संख्या मोठी असते. आपत्ती कधी सांगून येत नाही. तरी त्याचा सुगावा लागल्यावर त्याचे व्यवस्थापन अगदी बारकाईने करावे लागते. कोरोनाचेही तसेच होते. मागील वर्षी दळणवळण बंदी लागू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल, याची कुणी कल्पना केली नव्हती; मात्र पहिली लाट आटोक्यात आणण्यात यश आले. कोरोनाला भारताने पूर्णपणे हरवले नव्हते. त्यामुळे तो पुन्हा डोके वर काढणार, हे निश्चित होते. तरीही आपली व्यवस्था गाफील राहिली. त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच. दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी भारत सिद्ध नसल्यामुळे आरोग्ययंत्रणाच कोलमडून पडली. ऑक्सिजन, रेमडेसिविर आदी औषधे यांचा तुटवडा हा त्याचाच परिपाक होय.

कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची जशी संख्या वाढली, तशी मृतदेहांच्या दहनासाठी रांगा लागणे, मृतदेहांची अदलाबदल, मृतदेह मिळण्यासाठी नातेवाइकांना घंटोन्घंटे तिष्ठत उभे रहावे लागणे, मृतदेह स्मशानापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकांनी कुटुंबियांकडून सहस्रो रुपये आकारणे यांसारखी वृत्ते समोर येऊ लागली. यातून माणुसकीशून्य वर्तन दिसून आलेच; मात्र व्यवस्थेचे अपयश ठळकपणे दिसून आले. एखाद्या घरातील सदस्य मरण पावणे, ही त्या घरासाठी पुष्कळ वाईट गोष्ट असते. अशा कुटुंबावर कोसळलेल्या संकटात त्या कुटुंबाला आधाराची आवश्यकता असते; मात्र कोरोनाच्या काळात मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती सर्वत्रच दिसून आली. ही वृत्ती समोर येऊनही ती रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना काढण्यात आली नाही, ही त्याहून अधिक गंभीर गोष्ट आहे. मृतदेह नदीत सोडणे, हाही त्यातीलच एक प्रकार. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असतांना त्यांच्या अंत्यविधीची प्रशासनाने काय व्यवस्था केली ? भारताने असंख्य युद्धे, लढाया आणि नैसर्गिक आपत्ती पाहिली, या भूमीला समूहाने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रकार नवीन नाही. पानिपतच्या युद्धात दुसर्‍या दिवशी मराठ्यांनी युद्धस्थळी भेट दिल्यावर सैनिकांच्या मृतदेहांचा खच पडला होता, अशी रणभूमीची वर्णने आपण वाचतो; मात्र त्या काळात या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत असत. युद्धकाळातील स्थिती तर अतिशय विदारक असे. त्या काळात जर असे व्यवस्थापन शक्य होते, तर आता सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही मृतदेहांची हेळसांड का होत आहे ?

तीव्र आपत्काळाला कसे सामोरे जाणार ?

एखादी आपत्ती किंवा संकट आल्यावर त्याला व्यवस्था कशा प्रकारे सामोरी जाते ? यावरून ती किती पाण्यात आहे ? हे लक्षात येते. इतकी वर्षे जी व्यवस्था घडवण्यासाठी सिद्धता केलेली असते, तिचा कस लागतो. कोरोना महामारीने आरोग्ययंत्रणा, प्रशासन, पोलीस आदी सर्वांना उघडे पाडले. ‘गतीमान आणि जनताभिमुख’ असल्याची दवंडी पिटणारे प्रशासन जनताद्रोहीच असल्याची प्रचीती लोकांना ठायीठायी आली. ही वेळ का आली ? यात दोष कुणाचा ? कोरोनामुळे मृत झालेल्यांचा अंतिम प्रवास शांततेत व्हावा, यासाठी व्यवस्थेतील एकाही घटकाने प्रयत्न केले नाहीत. जर व्यवस्थेत संवेदनशीलता किंवा माणुसकी असती, तर रुग्णवाहिकांच्या चालकांकडून होणारी लूटमार, स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी होणारे ढिसाळ नियोजन आदी अपप्रकार थांबले असते. समाजामध्येही संवेदनशीलता नसल्यामुळे याविषयी मोठ्या प्रमाणात आवाज उठवून व्यवस्था सुधारण्यासाठी पाठपुरावा घेतला गेला नाही. पुढील काळ यापेक्षाही तीव्र असणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपण सिद्ध आहोत का ?