पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नरमध्ये जुन्नरनगर परिषदेने पशूवधगृहासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी निश्चित झाल्याची वार्ता स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली आहे. या निधी निश्चिती विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांतून तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूर्वीही अनेक वेळा जुन्नर येथे अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यात आली आहे. असे असतांना पशूवधगृहासाठी निधी निश्चित करणे अतिशय संतापजनक आहे, असे हिंदुत्वनिष्ठांनी म्हटले आहे. निधी निश्चितीसाठी स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी प्रयत्न केले आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे आमदार अतुल बेनके यांच्यावरही टीका होत आहे. या संदर्भात अतुल बेनके यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
शिवजन्मभूमीत पशूवधगृहासाठी निधी म्हणजे गोरक्षणाच्या कार्याचा अवमान ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना, दळणवळण बंदीतही गोवंश हत्येची अनेक प्रकरणे जुन्नरमध्ये उघडकीस आली. गोरक्षक स्वतःच्या जिवाचा विचार न करता गोरक्षणाचे कार्य करत आहेत. असे असतांना आता प्रशासनाकडून पशूवधगृहासाठी निधी संमत होणे अतिशय दुर्दैवी आहे. हा गोरक्षणाच्या कार्याचा अवमानच आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी कळवले आहे.
निधी तरतुदीला उच्च न्यायालयात आव्हान देणार ! – शिवशंकर स्वामी, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पुणे जिल्हा (बजरंग दल गोरक्षा विभाग)
शिवजन्मभूमीमध्ये पशूवधगृह म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीशी प्रतारणा आहे. निधी निश्चिती करून देणार्या आमदारांचा आम्ही महाराष्ट्रातील जनतेकडून निषेध करतो. ज्या ठिकाणी पोलिसांनी १८ अवैध पशूवधगृहे पाडली, त्या ठिकाणी शासकीय पशूवधगृह उभे करणे आणि शिवजन्मभूमीचे पावित्र्य कलंकित करणे हे आमदारांना शोभणारे नाही. त्या आमदारांनी राजीनामा द्यावा. ही संपूर्ण अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या वतीने मागणी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. मी शिवशंकर स्वामी माझ्या अधिकारात आमदार अतुल बेनके यांच्या शिवजन्मभूमीतील पशूवधगृहाच्या १ कोटी २० लाख रुपये तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.